धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief minister uddhav thackeray resign
धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना दिला विश्वास

धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही; उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला विश्वास

मुंबई : शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. (No one can take away ShivSena party symbol bow Uddhav Thackeray)

हेही वाचा: एकनाथ शिंदेंवर टांगती तलवार कायम? शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका

उद्धव ठाकरे म्हणाले, "कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधतो आहे. सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण हलकं करणं माझं काम आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरु आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेत नाही. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय झालं होतं ते काल सांगत होतो. त्यामुळं त्याचा अर्थ असा होत नाही की आमचं चिन्ह जाणार आहे"

हेही वाचा: वारकऱ्यांच्या आग्रहामुळे मी पंढरपूरला जाणार - उद्धव ठाकरे

दुसरं म्हणजे फोटो येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले पण असं नाहीए. कारण सध्या महापालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळं म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असतील, ज्यांना आम्ही निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिली होती, ते गेले असतील. शिवसेनाभवनात साधेसाधे शिवसैनिक येत होते. कालपरवापर्यंत शिवसेनाभवनात राज्यातील शिवसैनिक महिला आल्या होत्या आणि त्या वाघिणीप्रमाणं बोलत होत्या. तळहातावर पोट असणारी साधी लोकं येत आहेत आणि रडत आहेत. शिवसेनेनं साध्या व्यक्तींना मोठं केलं. पण जी मोठी झाली ती गेली. पण मोठ्या मनाची ही साधी माणसं जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला धोका पोहोचू शकत नाही.

विधीमंडळ पक्ष आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो - ठाकरे

म्हणून मुद्दा येतो की, शिवसेना कोणाची? शिवसेना ही आहे ती आहेच. त्यामुळं शिवसेना पळवून नेण्याची गोष्ट नाही. एक फरक आहे की विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. कारण पक्षातून आमदार गेले तरी पक्ष टिकून राहतो. नोंदणीकृत पक्षात असंख्य लोक असतात. त्यामुळं धनुष्यबाण या चिन्हाबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

Web Title: No One Can Take Away Shivsena Party Symbol Bow Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..