

सोलापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूरची वरदायिनी असलेले उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पुरामुळे भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर, बरूर आणि औज तसेच अक्कलकोट तालुक्यातील आळगे, खानापूर आणि हिळ्ळी हे सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चिंचपूर बंधारा पुराच्या पाण्याखाली गेल्याची माहिती मिळताच मंद्रूप अप्पर तहसीलचे तहसीलदार विष्णू बुटे, मंद्रूपचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास कंरडे, पोलिस उपनिरीक्षक राज डांगे व अमितकुमार करपे यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खबरदारीचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद केली. पूर पाहण्यासाठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही नागरिकाला अथवा पर्यटकाला पूर पाहण्यासाठी किंवा बंधारा ओलांडण्यासाठी पुढे जाऊ दिले जात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अक्कलकोट तालुक्यात बंधाऱ्यांत पाणी येण्याची चाहूल एक-दोन दिवसांपूर्वीच लागल्याने नदीपात्रातील मोटारी व पाइप बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. उन्हाळ्यात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीत पाणी उपलब्ध असले, तरी वीजपुरवठा केवळ दोन तास होत होता. त्याउलट कर्नाटक हद्दीतील नदीपलीकडील शेतकऱ्यांना सात तास वीज मिळत असल्याने त्यांनी नदीतील पाण्याचा अधिक वापर केला. अलीकडे वीजपुरवठा पाच तासांपर्यंत वाढला असला, तरी नदीतील पाण्याची कमतरता जाणवत होती. उजनी धरणाच्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीतून पाणी सोडण्यात आले. शिवाय वीर धरणातील विसर्ग मिसळल्याने भीमा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली. उजनी धरणातून ३० हजार क्युसेक्सहून अधिक विसर्ग आणि त्यासोबत वीर धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे आळगे, खानापूर व हिळ्ळी येथील बंधारे ओसंडून वाहू लागले. नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच नदीपात्रात गुरे धुण्यासाठी, पोहण्यासाठी अथवा सेल्फी काढण्यासाठी कोणीही उतरू नये; अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज असून आपत्कालीन पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
बंधारे ओसंडून वाहात आहेत
उजनी धरणातून पूर्वी सोडलेल्या पाण्यासह वीर धरणातील विसर्गाचा एकत्रित परिणाम म्हणून आळगे येथे सुमारे ६० हजार क्युसेक्सहून अधिक पाणी येत आहे. उजनीतून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा प्रभाव सुरू झाल्याने बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत.
- कृष्णा वडेर, शाखा अभियंता, अक्कलकोट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.