मुख्यमंत्रीपदाबाबत तडजोड नाही; भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री आज घेणार पालकमंत्र्यांची बैठक
मुंबई - अजूनही राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालील सरकार असून, आगामी सत्तास्थापनेअगोदरच कामाला लागण्याचा निर्णय आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी राज्यातील ओल्या दुष्काळावर चर्चा करण्यासाठी उद्या (ता. ६) दुपारी बारा वाजता सर्व पालकमंत्र्यांची ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर बैठक बोलाविण्यात आली असून, शिवसेनेची मात्र यामुळे कोंडी होण्याचे संकेत आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील शेतकरी व त्यांचे नुकसान, याबाबत काही महत्त्वाचे निर्णय होण्याचे संकेत आहेत. मात्र, विद्यमान मंत्रिमंडळातील शिवसेनेचे पालकमंत्री या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची शक्‍यता आहे. बैठकीला शिवसेनेचे मंत्री हजर राहिल्यास युतीतला तणाव निवळत असल्याचे संकेत मिळणार असून, बहिष्कार घातल्यास शिवसेनेला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत चिंता नाही. या टीकेचा सामना करावा लागेल, अशी अटकळ बांधली जाते. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमचे सरकार येणार, असे स्पष्ट करतानाच उद्यापासूनच आम्ही कामाला लागणार असल्याचे सांगितले. तर, शिवसेनेच्या काही पालकमंत्र्यांना विचारले असता या बैठकीबाबत आम्हाला माहिती नाही, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील, यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे राज्यातील नेतृत्वबदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील, आम्ही चर्चेला तयार आहोत; पण ठरल्याप्रमाणे लेखी द्या, याचा पुनरुच्चार केला.

भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत आज सुमारे दोन तास बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली. गेल्या दहा-बारा दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्‍ते खासदार संजय राऊत हे, ‘जे ठरले होते; त्याप्रमाणे करा,’ अशी मागणी करीत सत्तेत समसमान वाटा आणि मुख्यमंत्रिपद मागत आहेत. भाजपकडून मात्र याबाबत जाहीर वाच्यता केली जात नव्हती. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पहिल्यांदाच भाजपच्या वतीने ही कोंडी फोडण्यात आली आहे.

सत्तेत समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत असले; तरीही भाजप कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास तयार नाही. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी भाजपकडून अन्य नेत्याला पुढे केले जाऊ शकते, अशीही चर्चा होती. पण, त्यालाही आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे संसदीय मंडळ तसेच केंद्रीय नेतृत्व आणि श्रेष्ठी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्‍कामोर्तब केल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.

केंद्रीय नेत्यांनी सत्तास्थापनेचा निर्णय राज्यातच घ्या, असा सल्ला दिला होता. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी सोमवारी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. आज कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर पाटील यांनी फडणवीसच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे सांगितले.

चर्चेची दारे खुली
शिवसेनेला चर्चेसाठी आवाहन करताना पाटील म्हणाले की, आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी मागील दहा ते बारा दिवसांपासून शिवसेनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिवसेनेला चर्चेसाठी भाजपचे दार २४ तास उघडे असले, तरी कोणत्याही परिस्थितीत महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील आणि लवकरच सरकार स्थापन होणार आहे, असे सांगितले. भाजप नेत्यांच्या या भूमिकेबाबत शिवसेनेचे प्रवक्‍ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे. राऊत म्हणाले की, चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. मात्र जे ठरलेय ते लेखी द्यावे. हा शिवसेनेचा एका ओळीचा प्रस्ताव आहे. 

कोअर कमिटीची बैठक
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित होते.

दिल्लीचा सांगावा...शिवसेनेशी जरा दमानंच...
नवी दिल्ली - महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने चालू आहे काय, हा सुरवातीला काहीसा अशक्‍य वाटणारा प्रश्‍न आता गंभीर होत चालला आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील ही एक अभूतपूर्व स्थिती असेल.

दरम्यान, शिवसेनेबरोबर संबंध तोडण्याबाबत भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनी वर्तमान नेतृत्वाला सबुरीचा सल्ला दिल्याची माहितीही भाजपच्या गोटातून मिळत आहे. ज्या शिवसेनेबरोबर गेली तीस वर्षे आघाडी चालू आहे, त्यांच्याशी काडीमोड घेण्याबाबत विनाकारण घाई करू नये, असा सबुरीचा सल्ला भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी सध्याच्या भाजप नेतृत्वाला दिल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर त्यांची मुख्यमंत्रिपदाबाबतची आग्रही मागणी फेटाळण्याऐवजी त्याबाबतही फेरविचार करण्याचा सल्ला या नेत्यांनी दिल्याचे समजले. महाराष्ट्राबाबतच्या हाताळणीबाबत या नेत्यांनी काहीशी नाराजीही व्यक्त केली.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले होते व त्यांनी काल पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने वक्तव्ये करून पाच वर्षे तेच मुख्यमंत्री राहणार, कोणताही ‘फॉर्म्युला’ ठरलेला नाही, असे सांगून शिवसेनेच्या मागण्या धुडकावून लावण्याचा जो पवित्रा घेतला, त्याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज झाल्याचे समजते. पंतप्रधानांकडून त्यांना भेट न मिळणे, हा त्याचा एक संकेत मानला जातो. यामुळेच शहा यांनी त्यांना, ‘प्रथम शिवसेनेशी तुम्हीच संपर्क साधा आणि ही कोंडी फोडण्यास सुरवात करा,’ अशी सूचना दिल्याचे समजते. या घडामोडींनंतरच भाजपच्या स्वरात सौम्यता आल्याचे मानले जाते.

संरक्षणमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह तसेच ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक मंडळाचे सदस्य मुरलीमनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेनेबरोबरचे राजकीय संबंध तडकाफडकी संपुष्टात आणण्याबाबत सबुरी बाळगावी, असा सल्ला भाजपच्या वर्तमान नेतृत्वद्वयास दिल्याची माहिती मिळते. शिवसेनेबरोबर भाजपची गेली तीस वर्षे आघाडी आहे व त्यामुळे त्यांच्याबरोबरची युती तोडताना फेरविचार करावा, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. मुख्यमंत्रिपदाबाबतच्या आग्रही मागणीबाबतही या नेत्यांनी त्याचा विचार करण्यास हरकत नसल्याचेही सांगितले. १९९५ मध्ये शिवसेनेचे संख्याबळ थोडेसे अधिक होते व त्यामुळे मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे गेले ही बाब खरी असली तरी बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार लवचिकता दाखविण्यात हरकत नसली पाहिजे आणि निम्म्या-निम्म्या मुदतीच्या अटीवर हा वाद सोडवता येत असेल तर सोडवला जावा, असे मतही या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. 

निवडणूक कोणालाच नको!
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार व काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, ही बाब अद्याप संकल्पनेच्या स्वरूपातच आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना ही बाब अद्याप पचनी पडताना आढळत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही ही कोंडी लवकर फुटण्याची इच्छा आहे. कारण, त्यानंतरच सर्वांना आपापल्या राजकीय भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे आणि त्यानुसार कामाला सुरवात करता येईल, असे या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी नेतृत्वाला सांगितले आहे. मात्र, राज्यातील आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची इच्छा नाही, ही बाब स्पष्ट आहे.

राज्यामध्ये शिवसेना- भाजप युतीचेच सरकार स्थापन होणार असून, सर्वांनाच कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळू शकते. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील.
- सुधीर मुनगंटीवार, नेते भाजप

भाजपने या आधीच्या चर्चेमध्ये जे ठरले आहे ते लेखी पाठवावे, त्यानंतरच आम्ही चर्चा करू. चांगले सरकार यावे ही लोकांची भावना आहे, मुख्यमंत्री मात्र लोकांच्या मनातील असावा.
- संजय राऊत, नेते शिवसेना

शिवसेनेने ठरविल्यास राज्याला पर्यायी सरकार मिळू शकते, यासाठीचा निर्णय त्यांनी घ्यावा. आम्ही राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही.
- नवाब मलिक, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

सत्तास्थापनेचा तिढा कायम असल्याने प्रशासन ठप्प आहे. अशा स्थितीत राज्यात नवे सरकार कधी येणार हे माहीत नाही. यासाठी राज्यपालांनीच पुढाकार घेऊन मदतीची घोषणा करावी.
- अजित पवार, नेते राष्ट्रवादी

भाजप-शिवसेना महायुती लवकरच सरकार स्थापन करेल. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तो प्रस्ताव ते लवकरात लवकर देतील. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची दारे चोवीस तास खुली आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no solution on Chief Minister post Bjp Core Committee decission politics