

IPS solapur SP Atul Kulkarni
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : आषाढी एकादशीला यंदा ३२ ते ३३ लाख भाविक पंढरपुरात आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूरमध्ये १० हजार पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. एवढ्या मोठ्या गर्दीत एकाही वारकऱ्याचे चेन स्नॅचिंग, चोरी झाली नसल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘इतकी गर्दी मी कधीच बघितली नाही’ असेही ते म्हणाले.
आषाढी वारीच्या दिवशी (२५ जुलै) २४ तासांत एक लाख ३३ हजार भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले, तर एक लाख १० हजार भाविकांनी पददर्शन घेतले. पण, पंढरपूरमध्ये त्या दिवशी ३० लाखांवर भाविक होते. दरम्यान, यंदाच्या वारीत मानाच्या पालख्यांसोबत वाहनांची गर्दी खूप होती, भाविकही लाखोंच्या संख्येने होते. तब्बल ३० ते ३२ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा होत्या. पालखीतळावर वारकऱ्यांची सोय होती, पण वाहनांसाठी सोय नव्हती. त्यावेळी हायटेक ड्रोनची मदत झाली, त्याची रेंज १० किलोमीटरपर्यंत होती.
तरीपण, आम्ही लावलेले ३०० गामा कमांडो, १४० दुचाकीवरून रस्ता क्लिअर करीत होते. त्यांच्याकडे देशात पहिल्यांदाच वापरलेले ५-जी फोन दिले होते. त्यावरून एवढ्या गर्दीतही आम्हाला संवाद साधता आला, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. याशिवाय सुरक्षेसाठी गडचिरोलीतून बॉम्बशोधक व नाशक पथकही आले होते. त्यांनी पालखीतळ, पालखीमार्ग, मुक्कामाच्या ठिकाणी पाहणी केली. वारीतील गर्दी अचूकपणे मोजण्यासाठी आम्ही पंढरपूरमधील ३६० सीसीटीव्ही, पंढरपूरच्या प्रवेशद्वारावरील १० कॅमेरे, ड्रोन, ६५ एकर परिसरातील टॉवर रोबोटचा वापर केल्याचेही ते म्हणाले.
‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही होते टेन्शन’, पण...
२२ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिराचीकुलोरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे दर्शन घेतले होते. त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पालख्यांसोबतची गर्दी आणि आषाढी एकदशीसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी होती. त्यातच शक्तिपीठ आणि पंढरपूर कॉरिडॉरचे मुद्दे ऐरणीवर होते. पण, ‘एआय’ तंत्रज्ञान, गामा कमांडो, पोलिस बंदोबस्त, ड्रोन, अशा नव्या बाबींमुळे त्यांचे दर्शन व दौरा व्यवस्थित पार पडल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. तसेच आषाढीसाठी पंढरपूरमध्ये ३२ ते ३३ लाख भाविक असल्याने मुख्यमंत्री तेथे जास्त वेळ न थांबता पूजा संपवून त्यांनी भाविकांसाठी मार्ग मोकळा करून दिल्याचेही ते म्हणाले.
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन
आषाढी वारीत यंदा भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होती. पालकमंत्री, पोलिस महासंचालक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला. आमच्या सर्व अधिकारी व अंमलदारांनी खूप मेहनत घेतल्याने वारी यशस्वी झाली.
- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.