हल्ल्याची भीती नाही - दिब्रिटो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

 ‘‘मला कुणाच्याही हल्ल्याची भीती नाही, तर देशातील आर्थिक घसरणीची आहे. कारखाने बंद पडत आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत. शेवटी पोट आणि भूक प्रत्येकालाच आहे, त्यामुळे माणूस उभा राहिला पाहिजे,’’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.

पुणे - ‘‘मला कुणाच्याही हल्ल्याची भीती नाही, तर देशातील आर्थिक घसरणीची आहे. कारखाने बंद पडत आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत. शेवटी पोट आणि भूक प्रत्येकालाच आहे, त्यामुळे माणूस उभा राहिला पाहिजे,’’ अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील मंदीबाबत चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार केला, त्या वेळी ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते. विविध साहित्य संस्था, व्यक्तींनीही दिब्रिटो यांचा सत्कार केला. संस्कृतपंडित वसंत गाडगीळ यांनी दिब्रिटो यांना आलिंगन देत तीनशे वर्षे जगा अशा संस्कृत भाषेत  शुभेच्छा दिल्या.

दिब्रिटो म्हणाले, ‘‘माझे मराठीशी नाळेचे नाते आहे. मी अस्सल महाराष्ट्रीय आहे. पुनर्जन्म असेल, तर मला पुन्हा महाराष्ट्रात जन्माला यायला आवडेल. माझ्या प्रवचनात ज्ञानोबा आणि तुकोबाही असतात. आमच्या धर्मात धर्मांतराचा निषेध केलेला आहे, त्यास चर्चची परवानगी नसते, तरीही मिशनरी म्हणजे धर्मांतर असा गैरसमज पसरविला जातो. आज आमच्या शाळांसमोर प्रवेशासाठी रांगा लावल्या जातात, तरीही आम्ही धर्मांतर करतो  असे आरोप होतात, त्या वेळी  वेदना होते.’’ 

डॉ. कसबे म्हणाले, ‘‘साहित्यिक भूमिका घेत नाहीत; पण दिब्रिटो हे भूमिका घेणारे लेखक आहेत.’’ जोशी म्हणाले, ‘‘दिब्रिटो यांच्या मुखी ज्ञानोबा आणि तुकोबा आहेत. परिवर्तनाची पालखी त्यांना खांद्यावर घेतली आहे, त्यामुळे सध्याचे सामाजिक प्रदूषण दूर करण्याचे काम दिब्रिटो करतील.’’ 

विरोध करा; पण मुद्द्याला गुद्द्याने नव्हे, तर मुद्द्यानेच उत्तर दिले पाहिजे. विरोध असूद्या. तरीही आपण एकत्र बसू, समज-गैरसमज मांडू आणि ते दूर करू. कारण संवाद हेच सर्व वादांवरील उत्तर आहे. 
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not afraid of attack says Father Francis Dibrito