
नवनीत राणा, वकिलांमध्येच नाही एकवाक्यता; पत्रातून समोर आला गोंधळ
मुंबई : पोलीस स्टेशनमध्ये छळ झाल्याच्या आरोपांबाबत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांच्यामध्येच एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे. राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना ई-मेलद्वारे पाठवलेली तक्रार आणि अॅड. मर्चंट यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेला दावा यामध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे.

खासदार नवनीत राणा यांनी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये हीन वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला होता. मागासवर्गीय असल्यानं आपल्याला पोलिसांनी पिण्यास पाणीही दिलं नाही तसेच वॉशरुमही वापरायला दिलं नाही, असा आरोप केला होता. याद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून हक्कभंग झाल्याची तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एका पत्राद्वारे केली होती. हे पत्र त्यांनी ई-मेलद्वारे पाठवलं होतं. या पत्रामध्ये खार पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला हीन वागणूक दिल्याचं स्पष्टपणे लिहिलं आहे. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं यामध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांनी चहापान केल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. याद्वारे नवनीत राणा यांचे आरोप त्यांनी खोटे ठरवले होते.
दरम्यान, संजय पांडे यांच्या या ट्विटनंतर नवनीत राणा यांनी आपली बाजू फिरवली आणि आपल्याला छळवणुकीची वागणूक सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये दिली गेल्याचं म्हटलं होतं. आपले वकील अॅड. रिझवान मर्चंट यांच्याद्वारे त्यांनी ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली. मर्चंट यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवनीत राणा यांच्या सांगण्यानुसार ही माहिती देत असल्याचं म्हटलं होतं. या व्हिडिओत त्यांनी नवनीत राणा यांना खार नव्हे तर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये हीन वागणूक दिल्याचं म्हटलं आहे. पण नेमक्या याच गोष्टीत एकवाक्यता नसल्याचं आता समोर आलं आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी दावा बदलल्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनीही राणांच्या कोठडीदरम्यानं फुटेज समोर आणणार असल्याचं म्हटलं आहे.
Web Title: Not Seeing Unity Between Navneet Rana And Her Lawyer Rizwan Marchant Confusion Arose
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..