मुंबई - मागील काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्या चर्चेला काही प्रमाणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आता प्रफुल पटेल यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होणार का, यावर भूमिका स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत.भारत जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर, चांगलं आणि विकासशील सरकारची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेवर पटेल म्हणाले की, आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, असंही त्यांनी नमूद केलं.
आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेलं आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष वेगवेगळे विचारधारा आणि एवढे सारे लोकांना एकत्रित आणि एक संघ आणून आणि देशाला चांगला विकल्प देणे ही सोपी गोष्ट नाही. देशाने अनेक वेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. त्यामध्ये 1977 असो या 1989 की 1996 असे अनेक प्रसंग आले. ज्यावेळी देशात असं वातावरण निर्माण झालं तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. म्हणून एक चांगलं स्थिर सरकार असले पाहिजे, असंही पटेल यांनी नमूद केलं.
काही दिवसांपूर्वी मी आज जे इंडिया म्हणतात, त्यांच्या मीटिंगमध्ये गेलो होतो. त्यावेळी अनेक पक्षाचे वेगवेगळे विचार आणि वेगवेगळी मानसिकता दिसून आली. एकमेकांच्या बाबतीत कोणीही विश्वासार्हता प्रस्थापित करू शकले नाही. हे देशाला कुठपर्यंत परवडणारे आहे. हा सुद्धा विचार करण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.