राज्यात बैलांची संख्या घटतेय

दीपा कदम  
शनिवार, 18 जानेवारी 2020

शेतीसाठी उपयुक्त ठरणारा बैल हा शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा दोस्त असतो. पण शेतकऱ्यांपासून बैल आता दुरावू लागला आहे. शेतीसोबत बैल जगवणं हाताबाहेर गेल्याने राज्यातील बैलांचे प्रमाण ३२.१३ टक्‍क्‍यांनी घटल्याने गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. 

मुंबई - शेतीसाठी उपयुक्त ठरणारा बैल हा शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा दोस्त असतो. पण शेतकऱ्यांपासून बैल आता दुरावू लागला आहे. शेतीसोबत बैल जगवणं हाताबाहेर गेल्याने राज्यातील बैलांचे प्रमाण ३२.१३ टक्‍क्‍यांनी घटल्याने गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात मार्च २०१५ पासून गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला होता. गायींसह गोवंशातील सर्वांची वाढ आणि संरक्षण केले जावे या हेतूने हा बंदी कायदा लागू करण्यात आला. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या पशुगणना अहवालानुसार राज्यात एकूण गोवंशाचे प्रमाण १०.०७ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. यामध्ये बैलांचे कमी झालेले प्रमाण अत्यंत चिंतेची बाब असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी झालेल्या १९ व्या पशुगणनेनुसार राज्यात ५७ लाख २३ हजार शेती कामासाठी उपयुक्‍त असणारे बैल होते. नुकत्याच झालेल्या २० व्या पशुगणनेनुसार ३९ लाख ८४ हजार इतकेच बैल असल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली आहे. हे प्रमाण ३२.१३ टक्‍क्‍यांनी कमी झालेले दिसून येत आहे. 

शेतीचा ऱ्हास होत असल्याचे हे ठळक लक्षण असल्याचे निरीक्षण शेतीचे अभ्यासक महारुद्र मंगनाळे यांनी नोंदविले आहे.

देशी गायींच्या संख्येतही घट
पशुगणनेनुसार राज्यात देशी गायींचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी झालेले आहे. अशा गायींचे प्रमाण राज्यात १३.८५ टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. मात्र जास्‍त दूध देणाऱ्या पैदासक्षम असणाऱ्या विदेशी गायींचे प्रमाण वाढले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of bulls in Maharashtra is declining