esakal | "वर्षा'वर मराठी राजभाषा दिन ! "या' पाच पुरस्कारांचेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण; 20 लोकांचीच राहणार उपस्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Rajbhasha Din

यंदा प्रथमच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेला देण्यात येणार आहे. 

"वर्षा'वर मराठी राजभाषा दिन ! "या' पाच पुरस्कारांचेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण; 20 लोकांचीच राहणार उपस्थिती

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : यंदा प्रथमच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कारासाठी दोघांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेला देण्यात येणार आहे. मराठी राजभाषा दिनानिमित्त उद्या (शनिवारी) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह काही मोजक्‍या लोकांच्याच उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी 20 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कारासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध मान्यंवरांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पाच पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. उर्वरित पुरस्कार संबंधितांना घरपोच करण्यात आले आहेत. 

मराठी भाषेतील अभ्यासक, संवर्धक, प्रकाशकांचा या दिवशी गौरव केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन या विभागाच्या सचिवा प्राजक्‍ता लंवगारे- वर्मा यांनी केले आहे. दरवर्षी मराठी राजभाषा दिनाचा मोठा कार्यक्रम होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे राज्यभरात हा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. दरम्यान, दरवर्षी कविवर्य मंगेश पाडगावकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा व्यक्‍तीला दिला जातो; मात्र यंदा प्रथमच संस्थेलाही हा पुरस्कार दिला जाणार असून त्यासाठी आंध्र प्रदेशातील मराठी साहित्य परिषदेची निवड करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "या' पुरस्कारांचे वितरण 

  1. विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार : रंगनाथ पठारे 
  2. श्री. पु. भागवत पुरस्कार : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (नगर) 
  3. डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार : सुधीर रसाळ 
  4. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : संजय जनार्दन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image