esakal | दिवाळीनंतर सुरू होणार ऑफलाइन शाळा! सुरक्षिततेसाठी कराव्यात आठ उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी आल्यानंतर शासनाने ऑफलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे.

दिवाळीनंतर सुरू होणार शाळा! सुरक्षिततेसाठी कराव्यात आठ उपाययोजना

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटांचा अनुभव पाठीशी आल्यानंतर शासनाने ऑफलाइन शाळा (School) सुरू करण्यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. सप्टेंबरअखेरीस तिसरी लाट सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात असल्याने दिवाळीनंतर ऑफलाइन शाळा सुरू होतील, असे शालेय शिक्षण विभागाचे (Department of School Education) म्हणणे आहे. मात्र, दोन महिन्यांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या गावांमध्ये मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी आठ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: शेळगावच्या विद्यार्थ्याचा जुगाड! बनवली चक्क बॅटरीवर चालणारी सायकल

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जवळपास शंभरहून अधिक कोरोनामुक्‍त गावांमध्ये पारावरची शाळा सुरू केली होती. त्या ठिकाणी प्रथमत: मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन शिक्षणाचे काम सुरू होते. मात्र, दुसऱ्या लाटेतील रुग्ण कमी होत नव्हते अन्‌ तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे हा उपक्रम बंद करावा लागला. आता जिल्ह्यातील दोन हजार शाळांची स्वच्छता करून त्यांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्या शाळांमध्ये ऑफलाइन अध्यापन होऊ शकते, परंतु शासनाकडून अजूनही आदेश आलेले नाहीत. पहिल्या टप्प्यात पाचवीपासून पुढील वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर कोरोनाच्या स्थितीचा अंदाज घेऊन पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करता येतील, असे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक म्हणतात. दुसरीकडे मागील 16 महिन्यांपासून घरी बसून असलेल्या मुलांना ऑनलाइनच्या माध्यमातून वाईट सवयी जडल्या आहेत. त्या पालकांनीही शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. या सर्वांचा विचार करतानाच, मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देत कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन ऑफलाइन शाळांचा निर्णय होईल, असे शालेय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

अशा करता येतील उपाययोजना...

  • ग्राम संरक्षण समित्यांनी गावात बाहेरून येणाऱ्यांवर ठेवावा वॉच; लसीकरण अन्‌ नियमांच्या पालनावर असावा फोकस

  • शाळांमध्ये दरररोज 15 ते 20 विद्यार्थ्यांना बोलावून दोन तासांची भरवावी शाळा; गर्दी होऊ नये म्हणून सर्वांनीच घ्यावी दक्षता

  • कोरोनामुक्‍त गावांमध्ये सातत्याने व्हावी धुरावणी, फवारणी, कोरोना टेस्टिंग; गावात बाहेरून येणाऱ्यांना असावे कोरोना टेस्टचे बंधन

  • मोकळ्या वातावरणात सोशल डिस्टन्सिंग अन्‌ मास्कचा वापर करून द्यावे ऑफलाइन शिक्षण; मास्क, सॅनिटायझर शाळा, ग्रामपंचायतींनी द्यावे

  • कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन एक ते दोन महिने रुग्ण न आढळलेल्या गावांत सुरू व्हाव्यात शाळा

  • "शिक्षण आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत शिक्षकांवर सोपवावी त्यांच्या परिसरातील विद्यार्थ्यांची जबाबदारी

  • ऑनलाइन शिक्षणासाठी खेड्यापाड्यात नेटवर्क येत नाही; त्यांच्यासाठी असावी पारावरची शाळा

  • बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांचे प्राधान्याने व्हावे लसीकरण; शिक्षकांना लसीकरणाचे असावे बंधन

हेही वाचा: शाळा सुरु करण्याचा अ‍ॅक्‍शन प्लॅन तयार! चिमुकली शिक्षकांबाबतच अनभिज्ञ

राज्यातील पहिलीपासून सर्वच शाळा ऑफलाइन सुरू करण्याची मागणी वाढली आहे. त्यासंदर्भात टास्क फोर्स राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन काही दिवसांत ठोस निर्णय घेईल. तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन आहे. त्या वेळी मुलांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल.

- बच्चू कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण

loading image
go to top