दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ! 23 एप्रिलनंतर होईल परीक्षा

तात्या लांडगे
Sunday, 29 November 2020

ठळक बाबी...

  • दहावी वर्गासाठी असतात एकूण 64 हून अधिक विषय
  • बारावीतील विविध फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचे असतात 128 विषय
  • दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑफलाईनच होणार परीक्षा
  • सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करुन परीक्षा केंद्रांवरच होणार परीक्षा; केंद्रे वाढीची शक्‍यता

सोलापूर : दहावी आणि बारावीच्या विषयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍यप्राय मानले जात आहे. दुसरीकडे बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिकांद्वारे परीक्षा घेणेही विद्यार्थीहिताचे नाही. तर मे महिन्यातील उन्हाळा आणि जूनमधील पावसाळ्याचा अनुभव पाहता ही परीक्षा ऑफलाईनच घेतली जाणार असून 23 एप्रिलनंतर परीक्षा घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे.

ऑनलाइन परीक्षा अशक्‍य
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. दुसरीकडे त्यांच्या विषयांची संख्याही खूप असल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्‍य आहे. परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
- अर्चना काळे, अध्यक्ष, पुणे बोर्ड

 

दरवर्षी दहावी- बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी- मार्चपासून सुरु होते. मात्र, यंदा कोरोनामुळे 15 जूनऐवजी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तत्पूर्वी, ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांना एकतर्फीच शिक्षण मिळाले. आता 23 एप्रिलपर्यंत हे वर्ग सुरु राहणार असून त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु झाले आहे. दरम्यान, जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी गुगल मिटद्वारे ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. 23 एप्रिलपर्यंत किमान 70 टक्‍क्‍यांपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्यादृष्टीने शिक्षकांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 पैकी साडेनऊ हजार शाळा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे 59 लाख 27 हजार 456 पैकी सुमारे चार लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यात दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता एक ते दीड महिना उशिराने दहावी- बारावीची परीक्षा घेण्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले असून जानेवारीत बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर होईल, असेही सांगण्यात आले.

 

ठळक बाबी...

  • दहावी वर्गासाठी असतात एकूण 64 हून अधिक विषय
  • बारावीतील विविध फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांचे असतात 128 विषय
  • दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑफलाईनच होणार परीक्षा
  • सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करुन परीक्षा केंद्रांवरच होणार परीक्षा; केंद्रे वाढीची शक्‍यता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: offline X- XII exams ! The exam will be held after April 23