अरे व्वा! रुग्णांना मोबाईलऐवजी पुस्तकपेटी; सोलापूर विमा रुग्णालयात लवकरच ‘आयसीयू’च्या खाटा; कामगारांना नोंदणी बंधनकारक

कामगार विमा रुग्णालयात १०० खाटा असून आता त्यात १० आयसीयू बेड्‌सची भर पडणार आहे. हॉस्पिटलशी संलग्नित जवळपास ४५ हजार कामगारांची नोंदणी असून त्यांच्या कुटुंबीयांनाही येथे मोफत उपचार मिळतात. रुग्णालयात पोषक आहार, पुस्तकपेटी, ऑक्सिजन व पुरेशी औषधे, अशा सुविधा आहेत.
solapur
solapursakal

सोलापूर : कामगार विमा रुग्णालयात सद्य:स्थितीत १०० खाटा उपलब्ध असून आता त्यात दहा आयसीयू बेड्‌सची भर पडणार आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नेमले आहेत. हॉस्पिटलशी संलग्नित जवळपास ४५ हजार कामगारांची नोंदणी असून त्यांच्या कुटुंबीयांनाही येथे मोफत उपचार मिळतात. रुग्णालयात डासांच्या जाळ्या, पोषक आहार, पुस्तकपेटी, ऑक्सिजन व पुरेशी औषधे, अशा सुविधा आहेत.

पण, हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा नसल्याने विमा रुग्णालयाने यशोधरा हॉस्पिटलशी टायअप केले आहे. त्यामुळे आता डायलिसिस, कर्करोग, मेंदू, किडनी अशा आजारांच्या रुग्णांची सोय झाली आहे. तसेच विमा रुग्णालयातील रुग्णाला औषधे किंवा अन्य कशासाठीही पदरमोड करावी लागत नाही, हे विशेष. सोनोग्राफी, एक्स-रे, इकोची सोय रुग्णालयातच असून प्रसूती, सिजिरियनसह तातडीच्या शस्त्रक्रिया रुग्णालयातच होतात. आयुक्त डॉ. महेश वरुडकर, डॉ. अलंकार खानविलकर व डॉ. शशी कोळनूरकर यांच्या मादर्शनाखाली रुग्णालयाची वाटचाल सुरु आहे.

पौष्टिक आहारात अंडी, फळे, सोयाबीन, भाकरी

विमा रुग्णालयात दाखल रुग्णाला दररोज दोन वेळचे जेवण, सकाळी नाष्टा व दोन वेळेला चहा दिला जातो. पौष्टिक आहारात ज्वारी व नाचणीची भाकरी, ज्वारीचे उपीट, सोयाबीन, अंडी, फळे, पोहे असे पदार्थ दिले जाते. जेवणाची गुणवत्ता उत्कृष्ट असून रुग्णालयातील केवळ रुग्णासाठीच ही सुविधा उपलब्ध आहे.

मोबाईलऐवजी रुग्णालयात पुस्तकपेटी

रुग्णालयात दाखल रुग्ण अनेकदा मोबाईलवर काहीतरी पाहत बसतात. लहान मुलेही मोबाईलच पाहतात. चिमुकल्यांसाठी कामगार विमा रुग्णालयाने ‘पुस्तकपेटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. लहान मुलांना आवडणारी बहुतेक पुस्तके त्या पेटीत असतात. त्याला आवडणारे पुस्तक घेऊन तो वाचन करू शकतो. दुसरीकडे मोठ्या रुग्णांसाठी पण पुस्तके असून त्यांनाही मोबाईलऐवजी पुस्तके वाचनासाठीच आग्रह केला जातो.

रुग्णांसाठी दररोज ‘योगा’चे धडे

कामगार विमा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना दररोज सकाळी योगाचे धडे दिले जातात. तसेच त्याठिकाणी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक दोन्ही प्रकारची औषधे मिळतात. आता ‘पंचकर्म’ सुरू केले जाणार असून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

सर्वोपचार रुग्णालयात आता रुग्ण पाठविला जात नाही

कामगार विमा रुग्णालयात ज्या सुविधा नाहीत, त्यासाठी येथील रुग्ण श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविला जायचा. पण, मागील काही वर्षांपासून सर्वोपचार रुग्णालयामधील सिटी स्कॅन बंद आहे, एक्स-रेसाठी खूपच अंतर पार करावे लागते व तेथेही वेटिंग, अशा असुविधांमुळे विमा रुग्णालयाने यशोधरा हॉस्पिटलशी करार केला असून आता रुग्णांना त्याठिकाणी दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

रुग्णांना दर्जेदार उपचार देण्याचा प्रयत्न

विमा रुग्णालयाशी संबंधित कामगारांनी कार्ड नोंदणी करावी, आधार लिंक करणे जरुरी आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, डोळे अशा आजारांच्या रुग्णांसाठी आम्ही सतत शिबिरांचे आयोजन करतो. आता हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुरू होणार असून दोन महिन्यात ते सुरू होईल. रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत, हा त्यामागील हेतू आहे.

- डॉ. आसावरी कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय हॉस्पिटल, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com