

solapur city accident
solapur
सोलापूर : मुळेगाव रोडवरील यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णाला रक्ताची आवश्यकता होती. रुग्णालयाने रक्तासाठी डॉ. हेडगेवार ब्लड बँकेशी संपर्क केला. त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास ब्लड बँकेचे रक्तदूत विनायक वसंतराव कुलकर्णी (वय ३८, रा. सिद्धेश्वर नगर, मजरेवाडी) हे टेक्निशियन रणजित शंकर मळगे (वय २८, रा. तांदूर, ता. मंगळवेढा) यांच्यासमवेत रुग्णाच्या रक्ताचे नमुने घ्यायला जात होते. त्यावेळी जुना बोरामणी नाका परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत विनायक जागीच ठार झाला.
हैदराबाद रोडवरील मार्केट यार्डाकडून जड वाहने जुना बोरामणी नाक्यावरून अक्कलकोट, विजयपूरकडे जातात. जुना बोरामणी नाका चौक जड वाहनांसाठी अपुरा पडतो. चौकातील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी काढले होते; पण रस्त्यालगत वाहने थांबलेली असतात. मंगळवारी (ता. ५) पहाटे अडीच-पावणेतीनच्या सुमारास ब्लड बँकेतून विनायक कुलकर्णी व रणजित मळगे दुचाकीवर यशोधरा हॉस्पिटलकडे जात होते.
जुना बोरामणी नाका परिसरात दुचाकी आली होती, त्याचवेळी समोरून भरधाव ट्रक येत होता. रस्त्याच्या बाजूला खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी थांबली होती. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी रस्ता थोडा अरुंद झाला होता. रस्त्याच्या मधोमध असलेल्या ट्रकचा कट लागून दुचाकीवरील विनायक जोरात रस्त्यावर आदळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक मात्र अपघातानंतर मदतीसाठी न थांबता तसाच निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
‘एटीएम’चा सुरक्षारक्षक मदतीसाठी आला, पण...
अपघाताचा आवाज आल्यावर जवळील ‘एचडीएफसी’ बँकेच्या एटीएममधील सुरक्षारक्षक तेथे गेले; पण विनायक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पहाटे ३.०७ वाजता हा अपघात झाल्याचेही सीसीटीव्हीतून दिसते. त्या ट्रकचा शोध जोडभावी पेठ पोलिस घेत आहेत.
एक वर्षाच्या मुलीचा ३ दिवसांपूर्वीच वाढदिवस
मयत विनायक कुलकर्णी यांचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. तिचा तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता. विनायक हाच कुटुंबाचा आधार होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती साधारण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.