
‘ओमिक्रॉन’चे ८४ टक्के रुग्ण खडखडीत
पुणे : ओमिक्रॉन या कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले राज्यातील ८४ टक्के रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. उर्वरित १६ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे रविवारी देण्यात आली. राज्यात आजपर्यंत ओमिक्रॉनचे तीन हजार ९८६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी तीन हजार ३३४ (८४ टक्के) रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. त्यांचे प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले. त्या सर्व रुग्णांचे ‘आरटी-पीसीआर’ नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
ओमिक्रॉनची तपासणी करण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) करावे लागते. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आठ हजार ८०४ नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी सात हजार ४९९ नमुन्यांचे अहवाल सार्वजनिक आरोग्य खात्याला मिळाले आहेत. उर्वरित एक हजार ३०५ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहेत. ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ (एनआयव्ही), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था व बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे जनुकीय क्रमनिर्धारण केले जाते.
राज्यात रविवारी २१८ ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी २०१ भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्था येथे निदान झाले. तर १७ ‘एनसीएल’ येथून नमुन्यांचे अहवाल मिळाले. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई येथे आढळले आहेत. तेथे १७२ रुग्णांची नोंद झाली. पुणे शहरात ३०, गडचिरोली येथे १२ आणि पुणे ग्रामीण येथे चार नवीन रुग्ण आढळले.
Web Title: Omicron Patients Health Department Niv
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..