
आरोग्य भरती घोटाळ्यात 10 जण ताब्यात, सरकारी कर्मचारीही फितूर
आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री आणखी 4 जणांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 पर्यंत गेली आहे. सायबर पोलिसांनी औरंगाबाद, बीड, लातूर अशा वेगवेगळ्या भागातून आरोपींना ताब्यात घेतलंय.
संदीप शामराम गुत्तेकर (वय 38) व प्रकाश मिसाळ (वय 40) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरुन चार जणांना अटक करण्यात आली आहे.
सायबर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी लातूर, औरंगाबाद, बीड येथे कारवाई केली. त्यामध्ये 4 जणाना अटक केली. त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने याबाबत कारवाई करून आणखी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. आज ताब्यात घेतलेले आरोग्य विभाग तसेच सरकारी कर्मचारी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोग्य भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात वेगाने तपास सुरू आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड साठी पार पडलेल्या परिक्षांचे पेपर फुटले होते. त्यावेळेपासूनच पोलीस आरोग्य खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पाळत ठेऊन होते.
याआधी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा संशयित २८ वर्षांचा असून त्याला औरंगाबादेतून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कारवाई करत आणखी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने 6 जणांवर कारवाई केली. संबंधित परीक्षार्थीकडे प्रश्नपत्रिकाही सापडल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या व्यक्तीकडे हा पेपर कसा आला, याचा तपास सुरू आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या वतीने 24 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यात शेकडो विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं. त्यानुसार २८ नोव्हेंबरला ही फेरपरीक्षा पार पडली. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं.
यानंतर सार्वजनिक आरोग्य खात्यातील गट ‘ड’ संवर्गातील परीक्षा राज्यभरात झाली. यामध्ये पेपर फुटीची प्रकरणं समोर आल्याचं दिसलं. अनेक उमेदवारांकडे परीक्षा केंद्रावरील पेपर हाती येण्याच्या आधीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर आल्या होत्या. संबंधित प्रकरणात पुण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आणि पोलिसांनी तपासाला गती दिली.
आरोग्य विभागाच्या परीक्षा घेणारी 'ती' कंपनी ब्लॅकलिस्टेड?
आरोग्य विभागाच्या परीक्षांचं आयोजन करणारी कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये असल्याचं बोललं जातं. होतं. अन्य काही राज्यांमध्ये या कंपनीला बंदी असल्याची माहिती काहींनी दिली. त्यानंतर सतेज पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील पदांची भरती 'न्यासा' या संस्थेतर्फे पार पडली. प्रवेश पत्रातील त्रुटींमुळे ही परीक्षा सुरुवातीला रद्द करावी लागली. परंतु, भरती प्रक्रिया राबवणारी संस्था ही सद्यस्थितीत ब्लॅक लिस्टमध्ये नाही, असे स्पष्टीकरण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. काही तांत्रिक बाबींवर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले असावे. परंतु पुन्हा उच्च न्यायालयाकडून त्यांनी परवानगी घेतली, असेही ते म्हणाले. शेवटी, भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, उमेदवारांना त्रास होऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात 51 टक्के उमेदवारांनी दिली होती परीक्षा
पुणे जिल्ह्यातील ५१ टक्के उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य खात्याच्या गट ‘ड’ची परीक्षा दिली. पुण्यातील परीक्षा केंद्रावर कोणताही गोंधळ झाला नसून, सर्व केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
सार्वजनिक आरोग्य खात्यातील गट ‘ड’ संवर्गातील परीक्षा रविवारी राज्यभरात झाली. त्यापैकी पुण्यात १३२ केंद्रांवर ६० हजार ३१७ उमेदवारांसाठी परीक्षेची व्यवस्था केली होती. त्यापैकी ५१ टक्के उमेदवार परीक्षेसाठी उपस्थिती होते. या परीक्षा वेळेत आणि व्यवस्थित पार पडावी, यासाठी न्यासा कंपनीच्या बरोबरीने आरोग्य खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय होते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख यांनी दिली.