मुद्रांक शुल्कात एक टक्‍का कपात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

सवलतीचा ३० हजार जणांना फायदा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सुमारे २७ रजिस्टर कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयात मिळून दरदिवशी सुमारे आठशेहून अधिक दस्त होतात. तर दरवर्षी सुमारे २८ ते ३० हजार दस्त नोंदवले जातात. या सर्वांना या सवलतीचा फायदा होणार आहे, असे मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यानी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पुणे - मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आलेल्या शहरात दस्तखरेदी, गहाणखतावर आकारण्यात येत असलेला एक टक्का मेट्रो सेस पुढील दोन वर्ष न आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तशा अध्यादेश राज्य सरकारकडून शनिवारी काढण्यात आला. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १) सुरू होणार आहे. त्यामुळे पुण्यात ७ ऐवजी ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याच्या अर्थसंकल्पात मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार सरकारकडून हे आदेश काढले आहेत. मुद्रांक शुल्कातील ही सवलत राज्यातील पुणे, पिपंरी-चिंचवड, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर या शहरांमध्येच लागू असणार आहे.

पुणे शहरात दस्तनोंदणीवर सध्या ५ टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का सेस आणि एक टक्का मेट्रोसेस असे सुमारे ७ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यामध्ये एक टक्का हा मेट्रो सेस म्हणून नव्याने आकारला जात होता. परंतु तो आता पुढील दोन वर्षांसाठी न आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे आता दस्तनोंदणी, तसेच गहाणखत यावर ६ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. परिणाम नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one percent reduction in stamp duty