यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रवेशास 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ 

Yashvantrao Chavan University
Yashvantrao Chavan University

सोलापूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विविध शिक्षणक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 1 जून 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 5000 अभ्यास केंद्रांमध्ये साडेचार लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अजूनही विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव तसेच विविध भागातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी विद्यापीठाने 31 ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी मुदतवाढ दिलेली आहे. 

पुणे विभागीय केंद्रांतर्गत पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. कला, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, संगणक, वृत्तपत्र, ग्रंथालय, निरंतर शिक्षण, विज्ञान - तंत्रज्ञान, कृषी, शिक्षणशास्त्र, आरोग्य आदी विविध विद्या शाखांमध्ये प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी आदी शिक्षणक्रमांसाठी पुणे विभागांतर्गत आतापर्यंत जवळपास 70 हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित केलेला आहे. 

मुक्त विद्यापीठाची वैशिष्ट्ये 
मुक्त विद्यापीठाच्या "ज्ञानगंगा घरोघरी' या ब्रीदवाक्‍यानुसार, विद्यार्थ्यांची प्रवेशित संख्या वाढवण्यामध्ये सर्व अभ्यासकेंद्र व अभ्यासकेंद्र प्रतिनिधी यांचाही मोठा सहभाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी कुठूनही, कोणत्याही कॉलेजला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे आपला प्रवेश घेऊ शकतात. यासाठी आपल्या विहित कागदपत्रांचे कोणतेही मूळप्रत जमा करण्याची गरज नाही. आपली नोकरीं किंवा व्यवसाय सांभाळून शिक्षण घेता येते. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरलेल्या माफक शैक्षणिक शुल्कामधूनच अध्ययन साहित्य अभ्यास केंद्रामार्फत उपलब्ध करून दिले जाते. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क जमा करण्याची गरज नाही. 

मुक्त विद्यापीठाने सुरवातीपासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिलेला असल्याने 2015 पासूनच विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया व परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची होत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 31 ऑक्‍टोबरपूर्वी आपला प्रवेश निश्‍चित करावा व प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.digitaluniversity.ac.in या वेबसाइटवर तसेच येणाऱ्या अडचणीसाठी पुणे विभागीय केंद्राच्या 020- 24491107 किंवा 020- 24457914 या क्रमांकावर किंवा जवळच्या अभ्यास केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ. पंडित पलांडे, सहायक कुलसचिव हिरालाल माळवे, सहायक कक्ष अधिकारी संतोष वामन, सहयोगी सल्लागार उत्तमराव जाधव, तांत्रिक सहाय्यक शुभम लोंढे पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com