Corona Update: राज्यात कोरोनाचे अवघे १६१ रुग्ण! २० जिल्हे कोरोनामुक्त; नवा व्हेरिएंट पूर्वीच आढळला होता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update india
राज्यात कोरोनाचे अवघे १६१ रुग्ण! २० जिल्हे कोरोनामुक्त; नवा व्हेरिएंट पूर्वीच आढळला होता

Corona Update: राज्यात कोरोनाचे अवघे १६१ रुग्ण! २० जिल्हे कोरोनामुक्त; नवा व्हेरिएंट पूर्वीच आढळला होता

सोलापूर : राज्यातील गुजरात व ओरिसात बीएफ.७ हा कोरोनाचा व्हेरिएंट आढळला होता. परंतु, त्याला पोषण वातावरण नसल्याने त्यावेळी त्याची फारशी वाढ होऊ शकली नाही. प्रतिबंधित लस टोचून सर्वजण खबरदारी घेत आहेत. त्यामुळे परदेशात वाढत असलेल्या नवीन व्हेरिएंटचा धोका आपल्याकडे कमीच आहे, असा विश्वास राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केला.(Latest Corona Update)

जर्मनी, जपान, ब्राझिल व अमेरिकेत बीएफ.७ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला असून रुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मात्र, गुजरात व ओरिसात या दोन राज्यात जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये आढळला होता. त्यावेळी त्याचा फारसा झपट्याने प्रसार झाला नव्हता. त्यामुळे नवीन व्हेरिएंटला नागरिकांनी घाबरू नये. आपल्याकडे यापूर्वी ओमायक्रॉन आढळला असून प्रतिबंधित लसीकरणामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे.

लसीकरणातून शरीरात मेमरी सेन्स तयार झाल्या असून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला प्रतिकार करण्याची ताकद त्यात आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून मृत्यू थांबले आहेत. १ ते ३१ डिसेंबर या काळात राज्यात केवळ ७६३ रुग्ण वाढले असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६१ सक्रिय रुग्ण असून दिलासादायक बाब म्हणजे २० जिल्हे कोरोनामुक्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन व्हेरिएंटचा धोका खूपच कमी असल्याचेही आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

धोका नाही, पण सर्वांनी घ्यावी खबरदारी

कोरोनाच्या नवीन बीएफ.७ या नवीन व्हेरिएंटचा धोका कमीच असून ओमायक्रॉनचाच तो नवीन प्रकार आहे. आपल्याकडे ओमायक्रॉन पूर्वी आढळला, पण तो वाढला नाही. लोकांनी घाबरू नये, ज्येष्ठांनी विशेषत: उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्यांनी मास्क वापरावा, गर्दीत जावू नये. सर्वांनी संरक्षित डोस घ्यावा.

- डॉ. दिलीप म्हैसकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन

वीस जिल्हे कोरोनामुक्त

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे २० जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जळगाव, नंदुरबार, धुळे, परभणी, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या ९ जिल्ह्यांमध्ये महिनाभरात एकही रुग्ण आढळलेला नाही.