आषाढीनिमित्त पंढरपुरात येण्यास फक्त "या' नऊ पालख्यांना मिळाली परवानगी 

प्रमोद बोडके
Monday, 29 June 2020

पंढपुरात उद्या दुपारपासून संचारबंदी 
ज्यांना प्रशासनाने पास दिले आहेत अशाच मोजक्‍या व्यक्तींनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला यावे. ज्यांच्याकडे पास नाहीत त्यांनी येऊ नये. पंढरपूर शहर व परिसरातील दहा गावांमध्ये 30 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी पुकारण्यात आली आहे. चंद्रभागा नदीत स्नान करणे, कळस दर्शन यासाठी मनाई करण्यात आली आहे. 
- मनोज पाटील, पोलिस अधीक्षक, सोलापूर 

सोलापूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणीचा आषाढी एकादशी सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व आषाढी एकादशीच्या धार्मिक पूजा मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत पार पाडण्यासाठी राज्य सरकार व सोलापूर जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने सोलापूर जिल्हा प्रशासनाने महापूजेचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा होणार असून, मानाच्या वारकऱ्याला देखील यंदा या पूजेचा मान मिळणार आहे. 

आषाढी सोहळ्यानिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती देण्यासाठी सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यंदाच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये येण्यास महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील नऊ मानाच्या पालख्यांना परवानी देण्यात आली आहे.

त्यामध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान (आळंदी), संत तुकाराम महाराज संस्थान (देहू), संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जि. जळगाव), संत सोपानदेव महाराज संस्थान (सासवड, जि. पुणे), संत एकनाथ महाराज संस्थान (पैठण, जि. औरंगाबाद), संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान (त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक), संत नामदेव महाराज संस्थान (पंढरपूर), विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान (कवंड्यापूर, जि. अमरावती), संत चांगावटेश्‍वर महाराज देवस्थान (सासवड, जि. पुणे) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only nine of these palanquins were allowed to come to Pandharpur for Ashadhi