esakal | राष्ट्रवादीने हेरले सामान्य कुटुंबातील नवरत्न 
sakal

बोलून बातमी शोधा

ncp

आता लक्ष जिल्हा आणि तालुक्‍याच्या निवडीकडे 
विविध राजकीय पक्षाच्या विद्यार्थी आघाडीमध्ये विद्यार्थी नसलेल्या (शिक्षण सोडून खूप वर्षे झालेल्या) कार्यकर्त्याला संधी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी आघाडी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍न यातील अंतर वाढतच जाते. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी मिळाली आहे. नवीन प्रदेशाध्यक्षांच्या कालावधीतील जिल्हा व तालुका कार्यकारिणी कशी असणार आहे? या कार्यकारिणीत कोणाला संधी मिळणार? खरोखर विद्यार्थी असलेल्यांनाच विद्यार्थी आघाडीत संधी मिळणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या तीन महिन्यात जिल्हा व तालुका कार्यकारिणी पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीने हेरले सामान्य कुटुंबातील नवरत्न 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. 2014 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक, 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी अविस्मरणीय राहिली आहे. भाजप सत्तेवर येण्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला. अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकला. दिग्गजांना देण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील धडपड्या युवकांना संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांमध्ये स्वीकारले आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. 

राष्ट्रवादी युवकच्या कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीडच्या महिबुब शेख यांच्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला राष्ट्रवादीने संधी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने हाच पायंडा विद्यार्थी संघटनेच्या निवडीमध्येही कायम ठेवला आहे. पक्षाच्या वाढीसाठी विद्यार्थी आणि युवक या दोन आघाड्या महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही आघाड्यांमध्ये तळागळातील व राजकीय वारसा नसलेल्या नवख्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण राष्ट्रवादीने घेतले आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी झाल्या आहेत. या निवडीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा सामान्य कुटुंबातील तरुणांना संधी दिली आहे. ज्या युवकांना कोणताही राजकीय वारसा नाही अशा धडपड्या आणि ग्राउंडवर असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वारसा नाही म्हणून राजकारणाकडे पाठ फिरवणाऱ्या व हिरमोसणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने या निवडीच्या माध्यमातून चांगला मेसेज दिला आहे. 
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील व सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे.

प्रदेशाध्यक्षासह झालेल्या इतर महत्त्वाच्या नऊ निवडीमध्ये राष्ट्रवादीने सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी दिली आहे. याच कार्यकारिणीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्‍चिम महाराष्ट्र विभाग प्रमुखपदी निवड झालेले सुहास कदम सोलापूरचे आहेत. कोकण विभागाच्या प्रमुखपदी निवड झालेले किरण शिखरे हे कल्याणमधील आहेत. मराठवाड्याच्या विभागप्रमुखपदी निवड झालेले प्रशांत कदम औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्हा विभागप्रमुखपदाची जबाबदारी मिळालेल्या संध्या सोनावणे या मूळच्या नगर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात आहेत.नाशिक विभागाच्या प्रमुखपदी निवड झालेले चिन्मय गाडे हे नाशिक या जिल्ह्यातील आहेत. पूर्व विदर्भ विभागाच्या प्रमुखपदी निवड झालेले आशिष आवळे हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. आय. टी. सेलच्या अध्यक्षपदी जितेश सरडे हे नगर या जिल्ह्यातील तर पश्‍चिम विदर्भाच्या प्रमुखपदी अविनाश चव्हाण हे अकोला या जिल्ह्यातील आहेत. या सर्वांना कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त गुणवत्तेवर व कामाच्या जोरावर संधी मिळाली आहे.