शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

'सडक्या मनोवृत्तीच्या लोकांकडून शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली'

नागपूर - ‘‘शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करून सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असे वाटते की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही सडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटे ठरवीत आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,’’ असे विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘‘संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचे कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते,’’ असेही फडणवीस म्हणाले.

राजकारण करणारे उघडे पडतील

ते यासंदर्भात पुढे म्हणाले, की मला संभाजीराजे छत्रपती भेटले होते. त्यापूर्वीच त्यांनी मी कुठल्याही पक्षाचे तिकीट न घेता स्वतंत्र निवडणुकीला उभा राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. माझी अपेक्षा आहे की घराण्याची परंपरा पाहता मागच्या वेळी राष्ट्रपती कोट्यातून भाजपने आम्हाला समर्थन देऊन त्या पदावर बसवले. तसेच सगळ्या पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिले पाहिजे. सगळे समर्थन देणार असते तर त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल मी जरूर हायकमांड सोबत चर्चा करीन असे आश्वासन दिले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Opposition Leader Devendra Fadnaviss Press Conference

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top