काही आमदार अडकले 'व्हायरल इन्फेक्‍शन'च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 22 ते 25 आमदार हलका ताप, सर्दी आणि घशाच्या त्रासाने हैराण झाले आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तेव्हाच राजकीय डोसापाठोपाठ या आमदारांना वैद्यकीय उपचारही तातडीने देण्याची सोय केली आहे. 

पुणे : सत्तास्पर्धेने "पॉलिटिकल फिवर' वाढला असतानाच फोडाफोडीची दहशत, धावपळ आणि बदलत्या वातारणाचा फटका हॉटेलातील मुक्काम वाढलेल्या आमदारांना बसत आहेत. आपले आमदार भाजपच्या कचाट्यात फसण्याची भीती विरोधकांना असतानाच काही आमदार 'व्हायरल इन्फेक्‍शन'च्या जाळ्यात अडकले आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जवळपास 22 ते 25 आमदार हलका ताप, सर्दी आणि घशाच्या त्रासाने हैराण झाले आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तेव्हाच राजकीय डोसापाठोपाठ या आमदारांना वैद्यकीय उपचारही तातडीने देण्याची सोय केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाल्यापासून अवघा महाराष्ट्र चक्रावला आहे. बहुमत सिद्ध करण्याकरिता फडणवीस सरकारकडे पाच दिवस राहिले आहेत. त्यात अजित पवार समर्थक आमदारही राष्ट्रवादीच्या तंबुत असल्याने विरोधकांचा विश्‍वास वाढला आहे; तर बहुमतासाठी अजित पवारांवर विसंबून राहाता येणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस जाणून आहेत. त्यामुळे सत्ताबाजारात फोडाफोडीचे राजकारण माजण्याची चिन्हे आहेत. त्याच शक्‍यतेने शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस, आणि कॉंग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या निकालापासून राज्यात राजकीय अस्थितरता असल्याने सर्वच पक्षीय आमदारांची धावपळ सुरू आहे. त्यात काही दिवसांपासून सर्वच पक्षांना विशेषत: भाजपविरोधकांना अस्थिरतेने पूर्णपणे घेरले आहे. त्यामुळे आपपाल्या पक्षाच्या आमदार सरक्षित राहावेत, यासाठी देखरेखीखाली हॉटेलांत ठेवण्यात आले. दरम्यान, या साऱ्या धावपळीत काही आमदारांना ताप, सर्दी आणि घशाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याच्या तात्पुरत्या स्वरुपाचे उपचारही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition parties MLAs may be unpresent at floor test in Maharashtra