पंचनाम्याचे आदेश तलाठ्यांपर्यंत पोहचलेच नाहीत ! बळीराजाचा संसार उघड्यावर

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020

नदी काठांवरील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेशच मिळाले नाहीत. आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विशेषत: नदी काठावरील क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेले आहेत. पाणी आणि चिखल असल्याने थोडा विंलब लागत असून उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होईल.
- मुशीर हाकीम, तलाठी, सावळेश्‍वर

सोलापूर : कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या बळीराजाचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. तत्पूर्वी, जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचाही शेती पिकांना मोठा फटका बसला होता. या काळातील नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल द्यावा, असे आदेश मदत व पुनर्वसन विभागाने विभागीय आयुक्‍तांना दिले होते. मात्र, हे आदेश तलाठ्यांपर्यंत पोहचलेच नसल्याचे समोर आले आहे. तर आता विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती पिकांचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असतानाही सुरवातीला नदी काठच्या नुकसानीचेच पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आल्याने उर्वरित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

शेतमालाच्या हमीभावाची प्रतीक्षा करणाऱ्या बळीराजाला दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोक्‍यावरील कर्जाचा भार कमी होण्याऐवजी वाढू लागला आहे. तशातच महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभही लांबणीवर पडला असून नियमित कर्जदारांसह दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळालेली नाही. खासगी सावकारकीच्या पाशातून मुक्‍त होण्याचे स्वप्न पाहणारा बळीराजा कुटुंबासमोरील अडचणींचा डोंगर पाहून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. आता राज्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाकडून काहीतरी मदत मिळेल अशी आशा होती. मात्र, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळणार नाही, असे वक्‍तव्य करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बळीराजाचा अपेक्षाभंग केला आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे जुलै, ऑगस्टमध्ये बाहेर पडता आले नसल्याची कारणे महसूल प्रशासनातील काही अधिकारी देऊ लागले आहेत. तशातच पंचनामे करायला सुरवात झाली नसल्याने संसार उघड्यावर आलेल्या बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे.

नदी काठांवरील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेशच मिळाले नाहीत. आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विशेषत: नदी काठावरील क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेले आहेत. पाणी आणि चिखल असल्याने थोडा विंलब लागत असून उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होईल.
- मुशीर हाकीम, तलाठी, सावळेश्‍वर

पंचनामा झाल्याचे अहवाल प्राप्त नाहीत
जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागीय आयुक्‍तांना दिले आहेत. तर आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करुन अहवाल तत्काळ पाठवावेत, असे आदेश दिले आहेत. अद्याप एकाही जिल्ह्याचा पंचनामा अहवाल प्राप्त झालेला नाही.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The orders of the Panchnama did not reach the Talathis