Vidhan Sabha 2019 : भाजपमध्ये पुन्हा मेगाभरती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

नमिता मुंदडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला; तर वंचित आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या तंबूत दाखल झाले. 

विधानसभा 2019 
मुंबई/बीड - विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा एकदा अपेक्षेप्रमाणे मेगाभरती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदारसंघातून ज्यांना उमेदवारी जाहीर केली होती, त्या नमिता मुंदडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्का दिला; तर वंचित आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर हेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या तंबूत दाखल झाले. 

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत परळीमध्ये झालेल्या कार्यक्रमात नमिता मुंदडा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. ‘राष्ट्रवादी’तर्फे मुंदडा यांची उमेदवारी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केली असतानाही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने ‘राष्ट्रवादी’ला धक्का बसला आहे. केजमध्ये काही दिवसांपूर्वी मुंदडा यांच्या प्रचारार्थ लागलेल्या बॅनरवर ‘राष्ट्रवादी’चे चिन्ह, तसेच शरद पवार यांचे छायाचित्रही नव्हते. त्यामुळे त्या पक्ष सोडणार असल्याची कुणकुण लागली होती. 

लोकसभेला ‘वंचित’च्या तिकिटावर निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर यांना भाजपतर्फे बारामतीतून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. पडळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यामागे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगितले जाते. पडळकर यांच्याबरोबर शिरपूरचे (जि. धुळे) काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर चव्हाण या नेत्यांचेही भाजपमध्ये प्रवेश झाले. पडळकर यांनी स्वत:साठी कोणतेही पद न मागता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पडळकर हे लढाऊ कार्यकर्ते असून, त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा योग्य तो मान राखला जाईल, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले. 

सुरेश लाड, संजय दिना पाटीलही गळाला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती आजही कायम होती. कर्जतचे ‘राष्ट्रवादी’चे आमदार व सुनील तटकरे यांचे निकटवर्ती सुरेश लाड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other parties MLAs will enter BJP