थकहमीनंतरही 12 कारखान्यांनाच गाळप परवाना ! 188 कारखान्यांनी केले अर्ज 

तात्या लांडगे 
Tuesday, 29 September 2020

राज्यातील ऊस गाळप हंगामास 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होणार आहे. कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यानुसार 188 कारखान्यांनी अर्ज केले असून त्यापैकी 12 कारखान्यांनाच गाळप परवाना देण्यात आला आहे. 

सोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगामास 15 ऑक्‍टोबरपासून सुरवात होणार आहे. कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे. त्यानुसार 188 कारखान्यांनी अर्ज केले असून त्यापैकी 12 कारखान्यांनाच गाळप परवाना देण्यात आला आहे. 

कोरोनामुळे कामगारांची व्यवस्था स्वतंत्रपणे करून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी कारखान्यांनी केलेल्या उपाययोजनांची पडताळणी या वेळी साखर आयुक्‍तालयाकडून केली जात आहे. गतवर्षी राज्यातील 194 कारखान्यांनी उसाचे गाळप घेतले. त्यापैकी 99 टक्‍के एफआरपीची रक्‍कम कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. तसेच परवाना देताना प्रलंबित एफआरपी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीची रक्‍कम, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस, साखर संकुल निधी, परवाना फी याची पूर्तता कारखान्यांनी केलेली आहे की नाही, याचीही पडताळणी केली जात आहे. 

राज्यात यंदा उसाचे बंपर क्षेत्र असून यावर्षी 10 लाख 66 हजार हेक्‍टरवर गाळपासाठी ऊस शिल्लक आहे. कोरोनामुळे यंदा सुमारे दोन लाखांपर्यंत ऊसतोड कामगार येतील, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. मे महिन्यातील अंदाजानुसार यंदा राज्यात 815 लाख मे. टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावल्याने त्यात 30 हजार मे. टनाने वाढ होईल, असेही आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत राज्यातील 32 कारखान्यांना शासनाने कर्जहमी दिली आहे. त्यामुळे यंदा हे अडचणीतील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कारखान्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत करावेत अर्ज 
यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत साखर आयुक्‍तालयाच्या विभागीय स्तरावर कारखान्यांनी अर्ज केले असून त्यापैकी 66 अर्ज आयुक्‍तालयाकडे आले आहेत. त्यापैकी 12 कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. कारखान्यांकडील येणेबाकीसह अन्य बाबींची पडताळणी करून परवाने दिले जात आहेत. 
- उत्तम इंदलकर, संचालक, विकास, साखर आयुक्‍तालय 

"या' कारखान्यांना मिळाला परवाना 
लोकनेते बाबूराव पाटील शुगर (अनगर, ता. मोहोळ), समर्थ शुगर (जालना), गुरुदत्त शुगर, जवाहर साखर कारखाना, डी. वाय. पाटील शुगर, सरसेनापती शुगर (कोल्हापूर), दूधगंगा, हेमराज इंडस्ट्रीज, श्रीनाथ मस्कोबा (पुणे), दौंड शुगर, शंकरराव कोल्हे साखर कारखाना (नगर), छत्रपती संभाजीराजे शुगर (औरंगाबाद) या कारखान्यांना आतापर्यंत गाळप परवाना देण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Out of 188 sugar mills applied, 12 mills got crushing licenses