मोठी बातमी : राज्यातील साडेसात लाख रुग्णांची कोरोनावर मात: सोलापुरातील मृत्यूदर झाला कमी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

सोलापुरातील रिकव्हरी रेट राज्यात अव्वल 
राज्यातील रुग्णांची संख्या आता 11 लाखांकडे वाटचाल करीत असून मृतांची संख्या 26 हजारांहून अधिक झाली आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.88 टक्‍के एवढे आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.08 टक्‍क्‍यांवर आले आहे. आनंदाची बाब म्हणजे सोलापूर शहरातील रुग्णांचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) सर्वाधिक 84.01 टक्‍के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परजिल्ह्यातील व परराज्यातील रुग्ण उपचारासाठी सोलापुरात येऊ लागले आहेत. रुग्ण बरे होण्यातील शहरांमध्ये सोलापूर पोहचले असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले. 

सोलापूर : राज्यात आतापर्यंत दहा लाख 77 हजार 374 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 29 हजार 894 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सात लाख 55 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे. रूग्ण बरे होणाऱ्या शहरांमध्ये सोलापूर शहराचाही समावेश आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत सात हजार 528 रुग्ण सापडले आहेत. त्यातील सहा हजार 288 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे 446 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जून, जुलैच्या तुलनेत ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोलापुरातील मृत्यूदरात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या शहरातील रुग्णांचा रिकव्हरी रेट 84.01 टक्‍के तर मृत्यूदर 5.9 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

सोलापूर शहरातील रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदर सर्वाधिक 11.46 टक्‍क्‍यांवर पोहचल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह पालकमंत्र्यांनी वारंवार आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सोलापूर शहराचा स्वतंत्र आढावा घेतला. तर काही दिवसांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांनीही आढावा बैठक घेतली. आता सोलापुरातील रिकव्हरी रेट राज्यात टॉपवर आहे. शहरातील 72 हजार 322 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये 64 हजार 794 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत शहरातील चार हजार 413 पुरुषांना तर तीन हजार 115 महिलांना कोरोनाचा बाधा झाला आहे. दुसरीकडे तीनशे पुरुषांचा तर 146 महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जून महिन्यात एकूण टेस्ट केलेल्या संशयितांमध्ये 25.84 टक्‍के व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळले. तर आता एकूण टेस्टच्या 9.97 टक्‍के व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. दुसरीकडे जूनमध्ये सोलापूर मृत्यूदरात देशातील टॉपटेन शहरात होते. आता सप्टेंबरमध्ये शहरातील मृत्यूदर 3.07 टक्‍क्‍यांवर आला असून सरासरी मृत्यूदर 5.9 इतका असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी दिली. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 7.5 lakh patients in the state overcome corona: Mortality rate in Solapur has come down