esakal | राज्याला केंद्राकडून मिळणार १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन; रेल्वेनं असा तयार केला प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Express

राज्याला केंद्राकडून मिळणार १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन; रेल्वेनं असा तयार केला प्लॅन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : महाराष्ट्रातील ऑक्सिजनच्या तुटवडा भरुन काढण्यासाठी रेल्वेनं राज्यातून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे राज्यासाठी तातडीने ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली होती. यानंतर रेल्वे मंत्रालयानं रेल्वेद्वारे द्रवरुप मेडिकल ऑक्सिजन (LMO) पुरवण्याचा निर्णय घेतला. अशीच मागणी मध्य प्रदेश सरकारनंही केंद्राकडे केली होती. दरम्यान, महाराष्ट्राला १,५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. जो इतर मागणी केलेल्या राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

मुंबईतील कळंबोली येथील रेल्वेच्या मालवाहतूक शेडमध्येच उपलब्ध असलेल्या DBKM वॅगनवर रोड टँकर्स चढवून द्रवरुप ऑक्सिजन महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. त्यासाठी कळंबोली स्टेशनमधून उद्या १९ एप्रिलला ऑक्सिजन एक्स्प्रेसचे दहा टँकर विशाखापट्टणमकडे रवाना होणार आहेत. ही वाहतून विनाअडथळा व्हावी यासाठी रेल्वेमार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. बोईसर रेल्वे स्थानकातूनही असे टँकर पाठवले जाणार आहेत.

दरम्यान, कळंबोली येथून निघालेले दहा टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रुरकेला, बोकारोसाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर त्याठिकाणांहून द्रवरुप ऑक्सिजन घेऊन ही एक्स्प्रेस पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहे. कळंबोली स्टेनमध्ये उपलब्ध असलेल्या फ्लॅट वॅगनवर रोड टँकर ठेवून त्यातून ही ऑक्सिजनची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वे मंत्रालयानं राज्याच्या विनंतीवर हा पर्याय शोधून काढला आहे.

रेल्वेच्या फ्लॅट वॅगनवरुन रोड टँकरची वाहतूक करताना रेल्वे मार्गात ओव्हरब्रीजचे अडथळे येऊ नयेत म्हणून विशिष्ट प्रकारचेच टँकर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी रोड टँकर १६१८ वापरले जाणार आहेत. या टँकरसह रेल्वे मार्गावरील उंचीबाबतच्या चाचण्याही रेल्वेने घेतल्या आहेत. त्यानंतर आता ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये धावणार आहे.