'हीच ती वेळ'; सोशल मीडियावर पंकजा मुंडे समर्थकांची मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

भाजपकडून याचा इन्कार करण्यात येत असला तरी, सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केलीय. त्यावरून पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. 

मुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून याचा इन्कार करण्यात येत असला तरी, सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केलीय. त्यावरून पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळा
'हीच ती वेळ' या टॅगलाईन खाली सोशल मिडीयावर पंकजा मुंडे समर्थकांकडून शेअरिंग सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर लिहीलेल्या एका पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याचं चर्चा कालपासून सुरू आहे.

वाचा ही बातमी -  पंकजा मुंडेंबद्दल खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

आज सकाळी त्यात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. पण, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलंय. त्यातच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी ठाकरे कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही. 

शिवसेना आणि भाजप २०१४ साली विधानसभा निवडणुकीत आमने-सामने होते. त्यावेळी देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे बहीण असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात परळीमधून शिवसेनेचा उमेदवार दिला नाही. लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते प्रीतम मुंडे यांच्या पाठिशी उभे राहिले.  पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपच्याच अंतर्गत राजकारणामुळं हा पराभव झाल्याची चर्चा असून, त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत. येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde supporters Campaign on social media