पवार म्हणतात...कोरोनापेक्षा त्यांना राममंदिर महत्त्वाचे वाटत असेल 

प्रमोद बोडके
Sunday, 19 July 2020

अजॉय मेहता सोलापूरच्या दौऱ्यावर 
सोलापूर शहरासह, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणची पाहणी करण्याची सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजॉय मेहता हे 21 किंवा 22 जुलैला या भागाची पाहणी करणार असल्याची माहितीही खासदार पवार यांनी दिली. 

सोलापूर : कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्‍वावर पसरले आहे. या संकटात अडकलेले लोकच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या संकटातून जनतेला सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना पेक्षाही राममंदिराचा मुद्दा अधिक महत्वाचा वाटत असेल, मंदिर बांधल्याने कदाचित कोरोना निघून जाईल अशीच त्यांची भावना असल्याने ते राम मंदिराच्या बांधकामाची भूमिपूजन करू लागले आहेत अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सात रस्ता येथील नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील ज्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश आहे.

सोलापूरचे मी काही तरी देणे लागतो, त्यामुळे मी आज सोलापुरात येऊन कोरोना उपाययोजनांची माहिती घेतल्याचेही पवार यांनी सांगितले. मुंबईतील धारावी सारख्या झोपडपट्टी भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे आमची झोप उडाली होती. योग्य नियोजन आणि तेथील नागरिकांनी साथ दिल्यामुळे हा भागा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापुरातील कोरोनाही आटोक्‍यात येईल. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी ज्या काही आवश्‍यक उपाययोजना आहेत त्या करण्यासाठी राज्य सरकार सोलापूरला मदत करेल असा विश्‍वासही खासदार पवार यांनी व्यक्त केला. सोलापूर महापालिकेसह, जिल्ह्यासाठी आवश्‍यक असलेली साधन सामग्री उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी आपली चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar says ... Ram Mandir may be more important to him than Corona