पवार यांनी करावा सोलापूरचा दौरा...सोलापुरातील या नेत्याने केली विनंती 

प्रमोद बोडके
गुरुवार, 25 जून 2020

सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत तसेच प्रमुख्याने कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव याबाबत सविस्तरपणे या भेटीत चर्चा झाली. कोरोनाला रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करावा अशी विनंती व निमंत्रण मी दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त करत माझ्या विनंतीला होकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच आपण सोलापूर जिल्ह्याचा दौरा करू असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. 
- दीपक साळुंखे, माजी आमदार, सोलापूर 

सोलापूर : संकट भूकंपाचे असो की दुष्काळाचे. संकटातून सर्वसामान्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांची ओळख आहे. सोलापूर शहर व जिल्हा सध्या कोरोनाच्या भयानक संकटात सापडला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची व कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. संकटात अडकलेल्या सोलापूर जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही एकदा सोलापूरचा दौरा कराच अशी विनंती सोलापूरचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

मुंबई येथील शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी माजी आमदार साळुंखे यांनी बुधवारी (ता. 24) त्यांची भेट घेतली. कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे. दुधाचेही दर घसरले आहेत. समाजातील प्रत्येक घटक कोरोनामुळे येणाऱ्या आर्थिक संकटाची झळ सोसू लागला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती आपण केली असल्याची माहिती माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar should visit Solapur ... This leader from Solapur made a request