esakal | पन्नाशीच्या आतील व्यक्तींचाही सोलापुरात होऊ लागला मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

केंद्र सरकारचे मंत्री का करत आहेत दुर्लक्ष? 
सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मृतांची संख्याही याच भागात अधिक आहे. राजकीयदृष्ट्या विचार केल्यास भाजपला मानणारा मोठा वर्ग या भागात आहेत. राज्य सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, कृषिमंत्री दादा भुसे यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या भाजपच्या एकमेव नेत्यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपचे एकही मंत्री सोलापुरात अद्यापही आलेले नाहीत. प्रचाराचा शुभारंभ असो की विकासकामांचे उद्‌घाटन यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूरला प्राधान्य दिलेले आहे. सध्या सोलापूर शहर कोरोनाच्या भीषण संकटात अडकलेले असताना केंद्र सरकार सोलापूरकडे का दुर्लक्ष करत आहे? याचे कोडे अद्यापही कायम आहे. 

पन्नाशीच्या आतील व्यक्तींचाही सोलापुरात होऊ लागला मृत्यू 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाने घातलेले थैमान आता अधिक गडद होऊ लागले आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या आत सोलापूर शहरातील दोन हजार 84 जण कोरोनामुळे बाधित झाले आहेत. 234 जणांचा मृत्यू झाला (शुक्रवारच्या अहवालानुसार) आहे. सोलापुरात मृत पावणाऱ्या व्यक्ती या पन्नास वर्षावरील असल्याचे समाधान आजपर्यंत सोलापूरकर मानत होते. परंतु आता पन्नाशीच्या आतील व्यक्तींचाही कोरोनामुळे मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाचे संकट भयानक होऊ लागले आहे. 

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या सोलापूरच्या तुलनेत जास्तच आहे. या शहरांची लोकसंख्या आणि सोलापूरची लोकसंख्या याचा तुलनात्मक विचार केल्यास सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या मुंबई, ठाणे व पुण्यालाही मागे टाकणारी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्ती या पन्नास वर्षावरील आहेत. त्या व्यक्तींना इतरही आजार होते असे सांगून जिल्हा प्रशासन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील इतर शहरातही पन्नास वर्षावरील व्यक्ती आणि इतर आजाराच्या व्यक्ती आहेत. मग सोलापुरातच मृतांची संख्या का वाढत आहे? याचे कोडे अद्यापही सोलापूरकरांना उलगडलेले नाही. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आता हतबल झाली आहे. महापालिकेकडे प्रभावी उपाययोजना नसल्याने सोलापूर शहरात बाधितांची संख्या व मृतांची संख्या वाढत आहे. कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी अपयशी ठरलेले महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची सोलापुरातून उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी पी. शिवशंकर यांची नियुक्तीही झाली. तरी देखील सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात येत नसल्याने आता राज्य सरकार सोलापूरच्या बाबतीत काय निर्णय घेणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 

loading image