
सोलापूर : प्रतिभावंत ललित लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक, निःस्पृह वनाधिकारी आणि अवघे जीवन वनविद्येच्या अभ्यासासाठी आणि लेखनासाठी समर्पित करणारे व्यासंगी संशोधक म्हणून निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांची ओळख मराठी जगताला, निसर्गप्रेमींना आहे. सूक्ष्म निरीक्षण, गाढा व्यासंग, संशोधकाची दृष्टी, सृष्टिविषयक जागते कुतूहल या गुणांमुळे त्यांनी केलेले वन्यजीवांचे, कीटकसृष्टीचे आणि एकूणच निसर्गजीवनाचे चित्रण लक्षणीय ठरले आहे. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची हिरवी वाट निर्माण केली.
वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने तीन तपांहून अधिकचा काळ चितमपल्ली यांच्या भाळी वनवास लिहिला गेला हे खरे, परंतु हा वनवास ही एक संधी समजून आपल्या व्यवसायाचा सांधा अभ्यासविषयाशी जोडून घेत एखाद्या ऋषीसारखे जीवन व्यतीत करण्याचा निश्चय त्यांनी केला. वानिकी विद्येच्या शिक्षणाने आणि आदिवासींच्या सान्निध्याने त्यांना सृष्टीची रहस्ये खुणावू लागली. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने आणि निसर्गमग्न झालेल्या मनाने रानवाटा तुडवताना त्यांच्या संवेदनशील मनाला सर्जनाच्या वाटेची भूल पडली. पक्षितज्ज्ञ सालिम अली, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून या सर्जनोत्सुक काळात त्यांना निसर्गनिरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली . या सर्व संस्कारांतून मारुती चितमपल्ली यांच्यातला वनविद्येचा तत्त्वज्ञ ललित गद्यकार घडला.
चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्यजीवनावरील आपले अनुभव आणि संशोधन लोकांपर्यंत पोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली. अठरा भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग - जीवनानुभव आपल्या एकवीस ग्रंथांतून शब्दबद्ध केला आहे. ललित गद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मकथन, कोश वाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांतील लेखन त्यांनी केले.
'पक्षी जाय दिगंतरा', 'जंगलाचं देणं', 'रानवाटा', 'शब्दांचं धन', 'रातवा', 'मृगपक्षिशास्त्र', 'घरटयापलीकडे', 'पाखरमाया', 'निसर्गवाचन', 'सुवर्णगरूड', 'आपल्या भारतातील साप', 'आनंददायी वगळे', 'निळावंती', 'पक्षिकोश', 'चैत्रपालवी', 'केशराचा पाऊस', 'चकवाचांदण एक वनोपनिषद', 'चित्रग्रीव', 'जंगलाची दुनिया', An Introduction To Mrigpakshishastra Of Hansadev', 'नवेगावबांधचे दिवस', अशी साहित्यसंपदा त्यांनी निर्माण केली.
मारुती चितमपल्ली यांचे जीवन म्हणजे वनविद्येच्या अभ्यासाचे एक ध्यासपर्व आहे. वन्यजीव निरीक्षण ही एक साधना आहे आणि वनानुभवांना साहित्यात आणणे ही एक तपश्चर्या आहे, या भूमिकेतून त्यांनी अवघा लेखनप्रपंच केला. पालकाप्य मुनीने हत्तीचा, अजमुनीने रानबकऱ्यांचा, जाबालाने रानमेंढ्यांचा, शातकर्णी ऋषीने कांचनमृगाचा अभ्यास करावा त्याप्रमाणे चितमपल्ली यांनी समग्र वनजीवनाचा अभ्यास केला. वारकरी नेत्रांनी सावळ्या विठ्ठलाचे रूप पाहावे त्याप्रमाणे त्यांनी हिरवा, निळासावळा असा निसर्ग डोळयात साठवला. निसर्ग हा त्यांच्या अखंड चिंतनाचा विषय राहिला. त्यातूनच निसर्ग हे आपले दैवत आहे आणि साहित्यनिर्मिती ही आपली शब्दपूजा आहे, अशा श्रद्धेने त्यांनी निसर्गाची नानाविध रूपे शब्दबद्ध केली. त्यांची ही वनचित्रणे मराठी शब्दसृष्टीतील वनचिंतनेच नव्हे तर जीवनचिंतने ठरली. त्यांच्या लेखनांतून वनवैविध्य आणि वनमांगल्य आविष्कृत झाल्याने कितीएक वाचकांच्या मनात जंगलस्नेहाचे, निसर्गप्रेमाचे बीज रूजले. पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य या दोन्ही स्तरांवर चितमपल्लींचे हे योगदान बहुमूल्य आहे.
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, ही निसर्गाकडे पाहण्याची शुद्ध, स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी चितमपल्ली यांच्या निसर्गलेखनाला निराळेपण मिळवून देते. त्यांच्या ललित साहित्याचा एक लक्षणीय विशेष असा की, अरण्यविद्येतून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात त्यात येते. माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे ललित साहित्यात रूपांतर करण्याची किमया त्यांच्या निसर्गपर लेखनाने साधली. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. ललितगद्य आणि कथा या साहित्यप्रकाराच्या सीमारेषा धूसर करणारे त्यांचे लेखन नाना रसभावनांनी अंतर्बाह्य फुललेले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या भाराने ते वाकले नाही. शास्त्रीय ज्ञान ललितरूप धारण करून अवतरण्याचे अप्रूप त्यांच्या ललित गद्यात पाहायला मिळते.
चितमपल्ली हे वनमहर्षी आहेत, पण त्याबरोबरच त्यांची वृत्ती ही एका कलावंताची आहे. सृष्टीची रहस्ये उलगडून दाखवितानाच आपण कलाकृती निर्माण करीत आहोत. हा कलावंताचा भाव चितमपल्ली यांच्या मनात उत्कटतेने दाटलेला दिसतो. त्याचे हे एक उदाहरण पाहा- "मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधी पुनरावृत्ती नसते. देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो. पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी ओतीत असतात. नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. सागरकिनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यांतला कुठला आवाज गूढ आहे हे सांगता येत नाही. घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणे वाटते. " (पाखरमाया पृ. ९५) या हालत्या पिंपळपानांचा हा नादवेध किती विविध रूपात चितमपल्ली यांच्यातील ललित प्रतिभेने घेतला आहे, हे 'अति हळुवारपण चित्ता आणुणिया आपण जर पाहू गेलो तर त्यांच्या लेखनाचे नेमके मर्म आपल्या हाती लागू शकेल. चितमपल्ली यांच्या लेखनाला त्यांची अशी एक लय आहे. रूप, रस, गंध, नाद, स्पर्श अशा पंचसंवेदनांनी त्यांच्या लेखनाची रोचकता वाढलेली आहे. सृष्टीच्या माहीतगाराने अत्यंत रसज्ञवृत्तीने केलेले हे लेखन आहे. त्यातून वनविद्येचे, अरण्यानुभवाचे अस्पर्श, अनोखे असे हिरवे जग मराठी साहित्यात आले. त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्याच्या अनुभवाच्या कक्षा रूंदावल्या.
पक्षिजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय. पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे सबंध भावविश्व व्यापलेले आहे. त्यातून 'पक्षिवेडा माणूस' ही त्यांची ओळख सर्वदूर झाली. पक्ष्यांचे जीवन अणि त्यांचे अपार्थिव सौंदर्य त्यांनी आपल्या साहित्यातून अतिशय देखण्या व चित्रमय स्वरूपात शब्दबद्ध केले. चितमपल्ली यांच्या पक्षिवेडाचे फलित म्हणजे त्यांनी निर्माण केलेला 'पक्षिकोश' हा ग्रंथ. ४५० पक्ष्यांची माहिती त्यांनी या कोशात दिली आहे. कोश वाड्मयाची निर्मिती हे आपले एक जीवितकार्यच आहे या उत्कट ध्यासातून चितमपल्ली यांनी कोश वाड्मयाच्या कार्यास वाहून घेतले. पक्षिकोशाची निर्मिती करून मराठी जिज्ञासेला त्यांनी कायमचे ऋणाईत केले. 'पक्षिकोशा'त पक्ष्यांची अठरा भाषांतील नावे त्यांनी दिली आहेत. ज्या पक्ष्यांची मराठी नावे आढळत नाहीत त्यांचे नव्याने नामकरण त्यांनी केले. झाडे, पाखरे, प्राणी, यांची नवी, आदिवासी बोलीतील, विविध प्रदेशातील नावे त्यांच्या लेखनात आलेली आढळतात. चकवाचांदण, देवदंड... अशी किती तरी उदाहरणे सांगता येतील. मराठी भाषेला असे 'शब्दांचे धन' त्यांनी दिले. मराठी भाषा संवर्धनाचे केवढे महत्त्वाचे कार्य आहे हे!
चितमपल्ली यांच्या शब्दसंपत्तीचा गौरव करताना जी. ए. कुलकर्णी म्हणतात, “... शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी जिवंतपणे रूजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का यावदद्दलच मला सांशकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतडयाची एक ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे." (मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी, पृ. १७८)
वैविध्यपूर्ण प्राणिसृष्टीही चितमपल्ली यांच्या लेखनात येते. प्राण्यांची रूपवर्णने आणि जीवनशैली यांचे वेधक चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा रमते चितमपल्ली यांनी आपल्या प्रदीर्घ वनजीवनात वन्यजीवांचीही सूक्ष्म निरीक्षणे केली. जलीय जीवनाचा अभ्यास केला. आदिवासींची संस्कृती, त्यांचे निसर्गनिर्भर जीवन, आणि त्यांना ज्ञात असलेली सृष्टीची रहस्ये त्यांच्या ललित लेखनातून आविष्कृत झाली आहेत. अशा अदभुत, अलक्षित अरण्यसंस्कृतीच्या दर्शनातून त्यांच्या लेखनात विलक्षण असे वनविज्ञान प्रकटते. चितमपल्ली यांनी केवळ वनदर्शन घडवले नाही तर त्यातून जीवनदर्शन घडवले आहे. उन्नत, अनुभवसंपृक्त असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगीतले आहे. चितमपल्ली हे 'वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार' आहेत, हे त्यांचे लेखन अभ्यासले, आस्वादले की सहज लक्षात येईल.
- डॉ. सुहास पुजारी
(लेखक हे संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे मराठी भाषा आणि साहित्याचे प्राध्यापक आहेत. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यासह एकूणच निसर्गपर लेखनाचे ते अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.