
गुण वाढवायचे असेल तर ८० हजार द्या, आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना फोन
भंडारा : गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये (Health Department Exam) घोळ झाला होता. आता याच परीक्षांबाबत आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेरीटमध्ये यायचे असेल आणि गुण वाढवायचे असतील तर ८० हजार रुपये द्या, असे फोन आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना आले आहेत. तसेच फोन करणारी ही व्यक्ती एका मोठ्या अधिकाऱ्यांचा असिस्टंट असल्याचं सांगत आहे. यामुळे उमेदवारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा: आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात गोपीचंद सानपला पोलिस कोठडी
राज्य आरोग्य विभागाचा ग्रुप डी (चतुर्थ श्रेणी कर्मचारी) पेपर नोव्हेंबर महिन्यात झाला होता. भंडारा येथील विवेक आगळे यांनी आरोग्य विभागाचा हा पेपर दिला. त्यांना काही दिवसांपासून सतत एक फोन येत आहे. ''तुम्हाला मेरीट लिस्टमध्ये येण्यासाठी १० गुण कमी पडत आहेत. त्यामुळे तुम्हाला गुण वाढवायचे असतील तर ८० हजार रुपये द्या. तसेच नियुक्ती पत्र पाहिजे असल्यास २ लाख रुपये द्या'', अशी मागणी करण्यात आली. इतकेच नाहीतर विवेक यांचे परीक्षा केंद्र, पेपर सेट क्रमांक, ओमआर क्रमांक सुद्धा फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. माझे नाव सत्यप्रकाश असून मी आरोग्य विभागातील चव्हाण सरांचा असिस्टंट आहे, असं त्या व्यक्तीनं सांगितलं.
आमच्या खात्यावर पैसे पाठवायचे असेल तर त्याचे बँक डिटेल्स सुद्धा विवेक यांना व्हॉट्सअॅप करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य भरतीची माहिती लीक झाली की भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ सुरू झाला? असे प्रश्न उमेदवारांना पडला आहे. या फोनमुळे परीक्षार्थी संभ्रमात असून भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिस चौकशी करत आहेत.
Web Title: Phone Call To Health Department Exam Candidate Demand Money To Increas Marks Bhandara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..