शासकीय कर्मचाऱ्यांची व्यथा, कोरोनाची भीती अन्‌ बदलीची धास्ती 

प्रमोद बोडके
Sunday, 12 July 2020

विनंती बदल्यांकडे लक्ष 
अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे आई-वडील यांचे आजारपण, घरातील इतर सदस्यांचे वैद्यकीय कारण, स्वतःचे वैद्यकीय कारण आणि त्यात बदली हा नवीन डोकेदुखीचा विषय कर्मचाऱ्यांसमोर आला आहे. तसेच कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. यासह इतर कारणास्तव यंदा सरकारने फक्त विनंती बदल्या कराव्यात अशी मागणी संघटनांच्यावतीने करण्यात आली होती. सरकारने मात्र जुलै अखेरपर्यंत सर्वसाधारण बदल्यांचा निर्णय घेतला आहे. या बदल्यांमध्ये विनंती बदल्यांच्या माध्यमातून कौटुंबिक अडचणीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीचे ठिकाण मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : यंदा देशासह राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने बदल्या होणार नाहीत, अशीच शक्‍यता वर्तविली जात होती. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा बदली हा विषय अखेर कोरोनाच्या संकटातही समोर आला आहे. दरवर्षी 31 मे अखेरपर्यंत होणाऱ्या सर्वसाधारण बदल्या यावर्षी 31 जुलैपर्यंत करण्याच्या सूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता कोरोनासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यात बदलीचा विषय सुरू झाला आहे. कोणाची बदली कुठे होणार? कोण बदलीला पात्र आहे? याबाबतची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. 

यंदा कोरोनाचे संकट असल्याने बदल्या होणार नाहीत, अशीच शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे यंदाच्या बदली प्रक्रियेबाबत शासन काय भूमिका घेते? याकडे सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्ष लागले होते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत भूमिका स्पष्ट केली असून विविध संवर्गात कार्यरत असलेल्या पदांच्या 15 टक्के प्रमाणात सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही बदली प्रक्रिया 31 जुलैपर्यं करण्याच्या सूचनाही सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. 

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. कोरोनाच्या संसर्गामुळे 2020-21 या वित्तीय वर्षात राज्याच्या कर व करेत्तर उत्पन्नात अपेक्षित महसूल घट झाली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा त्याचा परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करू नये वित्त विभागाने सूचित केले होते. सामान्य प्रशासन विभागाने मात्र याबाबतची भूमिका स्पष्ट केली असून 31 मेपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण बदल्या या 31 जुलै पर्यंत करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The plight of government employees, the fear of corona and the fear of change