esakal | मोदींच्या सभांचा उमेदवारांना अपशकून! | Election Results 2019

बोलून बातमी शोधा

मोदींच्या सभांचा उमेदवारांना अपशकून! | Election Results 2019

- सातारा, परळी, जळगावसह विदर्भ व मराठवाड्यातील उमेदवारांना फटाका 

मोदींच्या सभांचा उमेदवारांना अपशकून! | Election Results 2019
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : भारतीय जनता पक्ष प्रत्येकच निवडणूक निकराची लढाई असल्याप्रमाणे लढते आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरतात. यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मोदींनी एकूण नऊ सभा घेतल्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (वांद्रे), खारघर, पुणे, परतूर, अकोला, भंडारा यांचा समावेश होता. मात्र, निकाल येऊ लागताच मोदींनी सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवारांची काय स्थिती एवढी वाईट का झाली, याचीच चर्चा सुरू झाली. 

साताऱ्यामधील निकाल सर्वाधिक धक्कादायक ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत चारच महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत येथून पुन्हा एकदा भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. छत्रपती घराण्यातील व्यक्ती आपल्या पक्षात घेतल्याने त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली. स्वतः पंतप्रधानांनी साताऱ्यात सभा घेत उदयनराजेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साताऱ्याची जागा प्रतिष्ठेची केली. श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी मेहनत घेतली. शेवटची पावसात झालेली सभा, त्यात पवारांनी भिजत केलेले भाषण व उदयनराजेंना खासदार करून आपण चूक केली होती व ती सुधारण्यासाठी आलो आहे, हे आव्हान हवा फिरवणारे ठरले. याचा परिणाम म्हणजे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

दुसरी महत्त्वाची निवडणूक होती, बीड जिल्ह्यातील परळीची. स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचा परळी हा मतदारसंघही प्रतिष्ठेचा झाला होता. पंकजा आणि त्यांचे चुलत भाऊ व राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते धनंजय मुंडे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची.

पंतप्रधान मोदी यांनीही येथे सभा घेत मतदारांना भावनिक आवाहन केले. शेवटच्या दोन दिवसांत येथेही साताऱ्याप्रमाणेच हवा फिरली व भाऊ-बहिणीतील भावनिक लढाईत मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने कौल दिला. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण नवी दिशा घेणार आहे. 
मोदींनी जळगावात घेतलेली सभा युतीच्या उमेदवारांसाठी फायद्याची ठरली असली, तरी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना विजयाने हुलकावणी दिली.

विदर्भामध्येही मोदींनी अकोला आणि भंडारा अशा दोन सभा घेतल्या, मात्र लोकसभेमध्ये युतीचा बालेकिल्ला ठरलेला हा भाग यावेळी कमी पडला. पुणे युतीचा बालेकिल्ला आहे व येथील आठही आमदार युतीचेच होते. मोदींच्या सभेनंतर हे यश बऱ्यापैकी कायम राहिले व केवळ हडपसर हा मतदारसंघ युतीच्या ताब्यातून निसटला. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले इंदापूरचे आमदार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व मावळातून बाळा भेगडे यांचा पराभवही धक्कादायक ठरला.

मुंबईमध्ये मोदी व उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली आणि मुंबई व कोकणाने युतीला पुन्हा सत्ता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या पदरी अपयश आले.