
अचलपूर राडा : भाजप पदाधिकाऱ्याचा हात? पुण्यातून घेतलं ताब्यात
अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्यावरून दोन गटात (Amravati Achalpur Violence) वाद झाला. या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. सध्या अचलपूर (Achalpur Stone Pelting) येथे तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचे आदेश कायम आहे. यामागे भाजप पदाधिकारी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भाजप (BJP) शहराध्यक्ष अभय माथणे यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा: अचलपूर : मनोरुग्णाने पळवली खासगी प्रवासी बस; जीवितहानी नाही
भाजप शहराध्यक्ष अभय माथणे यांनी कमानीवर झेंडा लावल्याची माहिती आहे. त्यानंतर दोन गटात वाद झाला. अभय माथणे यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यांना अचलपूर पोलिसांत आणले जाणार आहे. तसेच अचलपूर आणि परतवाड्यात सध्या तणावपूर्ण शांतता असून १ ते ९ व्या वर्गाच्या परीक्षा पुढे धकलण्यात आल्यात.
अचलपूर आणि परतवाडा शहरात या राड्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. सध्या अचलपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता या भागात पाहायला मिळत आहे. अचलपुरात पोलिस विभागातील वरीष्ठ अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत सातव, धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौर हसन, जुळ्या शहरातील तिन्ही पोलीस स्टेशनचे ठाणेदारासह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अचलपुरच्या परिस्थितीतीवर लक्ष ठेऊन आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? -
अचलपूर शहरातील खिडकी गेट आणि दुल्हागेट येथील ब्रिटीशकालीन दरवाजांवर दरवर्षी सण-उत्सवप्रसंगी शहरातील नागरिक झेंडे व फ्लेक्स लावतात. यावर्षीसुद्धा झेंडे लावण्यात आले होते. मात्र रविवारी सायंकाळी दहा वाजताच्या सुमारास काही असामाजिक तत्त्वांनी तेथील झेंडा काढल्याने वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेकही केली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात. पोलिसांनी २३ जणांना अटक केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली.
Web Title: Police Detained Bjp Leader In Achalpur Stone Pelting Violence Amravati
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..