पोलिस भरतीची २६ मार्च व २ एप्रिलला लेखी परीक्षा! मेगा भरतीची सुरवात कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mantralay
पोलिस भरतीची २६ मार्च व २ एप्रिलला लेखी परीक्षा! मेगा भरतीची सुरवात कधी?

पोलिस भरतीची २६ मार्च व २ एप्रिलला लेखी परीक्षा! मेगा भरतीची सुरवात कधी?

सोलापूर : राज्यातील १८ हजार ३३१ पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ८ दिवसांत निश्चित होऊन त्यांची परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर चालक व शिपाई उमेदवारांची लेखी परीक्षा अनुक्रमे २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी होणार आहे.

जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली पोलिसांची मैदानी चाचणी त्याच महिन्यांत संपली. परंतु, दीड महिन्यांपासून ना मैदानीचा निकाल ना लेखी परीक्षा, अशी स्थिती होती. यंदा प्रथमच उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिस भरतीसाठी राज्यभरातून दीडशे ते दोनशे तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले. त्यांच्या मैदानी चाचणीचे निकष स्वतंत्रपणे ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली.

या समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार आता तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी पार पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकच तृतीयपंथी उमेदवार असून त्याने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, गृह विभागाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार पोलिस चालक पदाची लेखी २६ मार्च रोजी होणार आहे. तर पोलिस शिपाई पदाची लेखी २ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा एकाचवेळी पार पडणार आहे.

चालक व शिपाई पदाची स्वतंत्र लेखी परीक्षा

गृह विभागाचे पत्र प्राप्त झाले असून पोलिस चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्च तर शिपाई पदाची परीक्षा २ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी, तृतीयपंथी उमेदवाराची मैदानी चाचणी पार पडेल. सोलापूर शहरातून एकाच तृतीयपंथी उमेदवाराने शिपाई पदासाठी अर्ज केलेला आहे.

- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

७५ हजार पदांची मेगाभरती कधी?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने विविध शासकीय विभागांमधील ७५ हजार रिक्तपदे भरण्याचे जाहीर केले. घोषणा होऊन साधारणतः: दोन-अडीच महिने उलटूनही मेगाभरतीची ठोस कार्यवाही अजूनपर्यंत सुरु झालेली नाही. भरतीच्या अनुषंगाने उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला, पण भरती कधीपासून सुरु होईल हे गुलदस्त्यातच आहे. राज्यभरातील तब्बल २५ ते २७ लाख तरुण मेगाभरतीच्या प्रतीक्षेत आहेत.