Eknath Shinde: राजकीय करिअर धोक्यात आलं अन्...CM शिंदेंनी बोलून दाखवली ती मनातील खंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde: राजकीय करिअर धोक्यात आलं अन्...CM शिंदेंनी बोलून दाखवली ती मनातील खंत

Eknath Shinde: राजकीय करिअर धोक्यात आलं अन्...CM शिंदेंनी बोलून दाखवली ती मनातील खंत

राजकीय वर्तुळात सध्या अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखती दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय करिअर धोक्यात आले तेव्हा हा निर्णय घेतला. शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते असे म्हणत मनातील खंत बोलून दाखवली आहे. ( political careers at risk Eknatsh Shinde feelings Nana Patekar maharashtra politics)

सन २०१९ ला मिळालेला जनादेश डावलून आम्ही चूक केली. संधी अनेक वेळा आली होती. पण दुदैवाने ती आम्ही घेतली नाही. जेव्हा सगळेच असह्य झाले, पुढचे राजकीय करिअर धोक्यात आले, तेव्हा हा निर्णय घेतला. शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

नेमकं काय म्हणाले शिंदे?

ज्या वेळी अनैसर्गिक गोष्टी घडतात त्या मनाला न पटणाऱ्या असतात. मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. पुढे काय होईल मला माहिती नाही. पण आता लढायचे आहे. लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायचीच, असा निर्णय घेऊन मी मोठे काम केले. आम्ही पक्षासाठी घाम गाळला. घरादाराची पर्वा केली नाही. मात्र, पक्षाचे अहित होत आहे, हे लक्षात आल्यानंतर पाच वेळा विनंती केली. जे सुरू आहे ते दुरुस्त करा, असे सांगितले.

मात्र, ऐकायचेच नाही, असे त्यांनी ठरवले होते. आम्ही काही फार आनंदाने हा निर्णय घेतलेला नाही. भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला होता. तो डावलून सरकार बनवण्याचा अट्टहास केला गेला. झालेली चूक आम्ही तीन महिन्यांपूर्वी दुरुस्त केली आहे.

कोविड असल्यामुळे चूक दुरुस्त व्हायला वेळ लागला. काही वेळ त्यांना समजावण्यात गेला. पण आम्हाला यश आले नाही. पण आम्ही लोकांच्या मतांचा आदरच केला आहे, असे सांगत शिंदे यांनी आपले मन मोकळे केले.