...म्हणून विधानसभेत राष्ट्रवादीला फटका : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार व जिल्हाध्यक्षांची बैठक

मुंबई : वंचितला पाठिंबा देणारा दलित, नवबौद्ध हा वर्ग आपल्या बाजूला आहे की नाही हे पाहिले नाही. त्यामुळेच त्याचा फटका बसला आहे. आता आपल्या कामाने हा समाज आपल्याकडे कसा येईल, असा प्रयत्न येत्या काळात करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांसाठीची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विधानसभेची निवडणूक झाली. निकाल संमिश्र लागला. काही ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे, हे लोकांनी लक्षात आणून दिले. 

तुम्हाला यश आले नाही, त्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीत व राज्यात त्यांचे सरकार असल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला, असा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच माझ्याच पक्षातील कार्यकर्ता काम करत नाही. विरोधी काम करतो. त्यावेळी मी स्वतः चे काम तपासून घ्यायला हवे, अशी कबुली शरद पवार यांनी दिली.

तसेच मुंबई, ठाणे याठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता एकच जागा मुंबईत आली आहे. पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी शक्ती उभी करणार आहे. तुम्ही त्याचा वापर करून घ्या. महाराष्ट्रात तुम्हीच अग्रभागी आहात, हे लक्षात आणून देवू या, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

तरुणांचा चांगला पाठिंबा

तरुणांनी पक्षाला चांगला पाठिंबा दिला. मुळात यावेळी अल्पसंख्याक समाजाची शक्ती राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिली. काय वाटेल ते झाले तरी भाजप नको असे त्यांनी ठरवले होते. शिवाय शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. मात्र, काही ठिकाणी आपण मागे पडलो अशी स्पष्ट कबुलीही शरद पवार यांनी दिली.

गरीब वर्ग वंचितच्या मागे

समाजातील जो गरीब वर्ग आहे, तो वंचितच्या मागे उभा राहिला, लोकसभेत पाठिशी राहिला. त्यामुळे ती ताकद दिसून आली. मात्र, जो मुस्लिम समाज वंचितच्या पाठिशी राहिला. तो विधानसभेत मुस्लिम समाज बाजूला गेला तर नवबौद्ध आणि इतर वंचितच्यामागे उभा राहिला.

सत्ताधाऱ्यांबाबत जनतेत राग

इगतपुरी येथे आदिवासी समाज पाड्यात गेलो. तिथे सत्ताधाऱ्यांबाबत राग पाहायला मिळाला, असा किस्सा सांगतानाच या सर्वांना संघटित करावं लागणार आहे. त्यांच्या पाठीशी आहोत हा विश्वास दिला पाहिजे, असे काम आपल्याला करायचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.

पराभवाचा विचार करणार

काही ठिकाणी पराभव झाला. त्याचा विचार केला पाहिजे. संघटनात्मक काम कमी पडले. त्याची किंमत मोजावी लागली. अनेक जिल्हे आहेत. तिथे वर्षानुवर्षे एकाकडेच जबाबदारी आहे तिथे नव्याने संधी दिली पाहिजे. त्यावेळी तो जोमाने काम करेल. 

संघटनात्मक काम करण्यात कमी

एससी व एसटी या समाजाच्या ठिकाणी संघटनात्मक काम करण्यात कमी पडलो. त्यांना पक्षात प्रतिष्ठा देत आहे की नाही हेही पाहिले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Statement of Sharad Pawar about NCP After Election Results