अमित शहांचे 'रात्र'कारण पुन्हा यशस्वी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

- फडणवीस सरकार पाच वर्षे टिकण्याचा भाजपला विश्‍वास 

नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या 'ऑपरेशन'मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा गट गळाला लावला. तेव्हा दिल्लीच्या कृष्ण मेनन रस्त्यावरील थंडगार शांततेतही भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या घराच्या आवारातील "वॉर रूम' रात्रभर धगधगत होती.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपमधून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या कारवाईतून मध्येच बाहेर आलेले व लगोलग मुंबईला गेलेले भूपेंद्र यादव व एका मध्यस्थ संघनेत्याचे दूरध्वनी शहा यांना सतत येत होत. अजित पवार यांच्याशी सुरू असलेली चर्चा निर्णायक टप्प्यावर आल्यावर त्यांच्याशी स्वतः शहा यांनी पहाटे साडेतीनच्या आसपास चर्चा केली व सकाळी राजभवनावर तुम्ही व देवेंद्रजी मिळून जा, असे सांगितल्याचीही माहिती आहे. 
दुसरीकडे "तेल गेले व तूपही गेले' अशी अवस्था झालेल्या शिवसेनेचे अनेक आमदार विधानसभेतील 30 तारखेच्या शक्तिपरीक्षणापर्यंत फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यास पुढे येतील व हे सरकार पाच वर्षे भक्कमपणे टिकेल, असा विश्‍वास भाजप सूत्रांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिनाभरापूर्वीचा शब्द खरा केला, त्यामागे दोन मराठी नेत्यांची अप्रत्यक्षपणे महत्त्वाची मार्गदर्शक भूमिका राहिल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी गोव्यात मध्यरात्रीतून पार पाडलेले "ऑपरेशन' समोर ठेवतानाच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची "पुण्याई' भाजप नेतृत्वाच्या कामी आली, असे भाजप नेते अतिशय सूचकपणे सांगतात. या साऱ्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार याची पूर्ण कल्पना भाजप नेतृत्वास असल्याचेही सांगितले जाते. 

राज्यातील नव्या सत्ता समीकरणानंतर कॉंग्रेसमधील एका गटाला हायसे वाटल्याची भावना सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणाऱ्या एका नेत्याने भाजप नेत्यांशी बोलताना व्यक्त केल्याचे समजते. या साऱ्या नाट्यात प्रकाशझोतात राहिलेल्या एकमेव नेत्याबद्दल शिवसेनेच्या आमदार-खासदारांत अतिशय संतप्त भावना आहेत व तुम्हाला ती येथे लोकसभेतही दिसेल; जरा नीट पाहा, असेही भाजप सूत्रांनी सांगितले. अमित शहा यांचे "ते जगप्रसिद्ध कौशल्य' माहिती असल्यानेच शिवसेनेच्या नेतृत्वात चलबिचल सुरू असल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.

मराठी जनतेने युतीला दिलेल्या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला, हा मुद्दा राज्यातील जनतेला पटला आहे, असाही दावा भाजपमधून केला जातो. फडणवीस सरकारच्या मागे आजच 105 अधिक 45 अधिक 14 असे किमान 160 आमदारांचे भक्कम बळ आहे व यात बेरीजच होणार, असा दावा भाजप नेते छातीठोकपणे करतात. या संपूर्ण रात्र-खेळाबाबत भाजपमधील केवळ दोन ते तीन सर्वोच्च नेत्यांनाच माहिती होती, अशी माहिती समोर आली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा आजही महाराष्ट्र जिंकला, असे मानत नाहीत.

येत्या 30 तारखेच्या विश्‍वासदर्शक मतदानात विजयापर्यंत भाजपही तसे मानत नाही, असे नमूद करतानाच वरिष्ठ पक्ष सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रपतींनी पहाटे साडेपाचच्या सुमारास राष्ट्रपती राजवट उठविल्याच्या आदेशावर सही करणे यात गैर काय आहे? जर याकूब बाबतच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय मध्यरात्री उघडू शकते, तर राष्ट्रपतींनी केलेल्या या सहीवर आक्षेप घेण्याचे कारण काय? 

शिवसेनेला पाठिंबा देण्यास कॉंग्रेसने जो अवसानघातकीपणा केला त्याच्या पटकथेचा एक हिस्सा गडकरी-अहमद पटेल यांच्या भेटीत लिहिला गेला नसेलच असे कोणीही सांगू शकत नाही. किंबहुना धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने यापूर्वी फोडले तेव्हा दिवंगत मुंडे यांनी कोणती शपथ जाहीरपणे घेतली होती हे आठवा, असेही पक्षसूत्रांनी सांगितले. 

शहा यांच्या गुप्त हालचाली

भाजप नेतृत्वाने गेले दोन, तीन दिवस या "ऑपरेशन'ला मूर्त रूप देण्यासाठी निर्णायक हालचाली केल्या. अजित पवार यांचे मन वळविण्यासाठी संघाची पार्श्‍वभूमी असलेल्या मुंबईतील एका भाजप कार्यकर्त्याने अतिशय कळीची भूमिका पार पाडली. देवेंद्र फडणवीस यांना काल सायंकाळी "आता उद्या सकाळपर्यंत कोणालाही भेटू नका,' असे सांगितले गेले.

नंतर फडणवीस यांनी स्वपक्षीय नेत्यांबरोबरच्या भेटीही रद्द केल्या. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी काल सायंकाळचे दिल्लीचे विमान रद्द करून आज सकाळी साडेआठनंतर जाण्याचा निर्णय कळविला. मध्यरात्रीनंतर राजभवनात शपथविधीची तयारी झाली. त्या वेळीही अतिशय निवडक कर्मचाऱ्यांना त्यात सहभागी करून घेतले गेले, अशा शब्दांत या नेत्याने भाजप नेतृत्वाच्या गुप्ततेबद्दल सांगितले. 

केंद्रीय पथकाचा योगायोग 

अतिपाऊस व महापुरामुळे राज्यातील शेतकरी उद्‌ध्वस्त आहे. अस्मानी संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला आता स्थिर सरकार हवे होते व ते मिळाले आहे. पुढील आठवड्यात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मोठे 'पॅकेज' जाहीर होणार आहे, असेही सांगितले जाते. केंद्रीय कृषिमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी राज्यसभेत तसे सूतोवाच केले. केंद्रीय पथक राज्यात पाठविण्याबाबत त्यांना शुक्रवारीच (ता. 22) सांगण्यात आले, असाही योगायोग सांगितला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Strategies of Amit Shah have been succeed in Maharashtra