
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या कौतुकाची. ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी शरद पवार यांच्या सातत्य आणि समर्पणाचे तोंडभरून कौतुक केले.
“शरद पवार यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. या वयातही, जय-पराजयाची तमा न बाळगता ते सातत्याने काम करत राहतात,” असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यातून राजकीय विरोधकांबद्दल आदर व्यक्त करण्याची त्यांची खास शैली दिसून आली. मात्र, त्यांनी काही गोष्टी स्वीकारत नसल्याचेही स्पष्ट केले, ज्यामुळे त्यांच्या आणि पवार यांच्यातील वैचारिक मतभेदही अधोरेखित झाले.