डाळिंबाच्या फवारणीसाठी वापरले जाते चक्क फिल्टरचे पाणी! 

शुभजीत नष्टे 
Saturday, 5 September 2020

पिलीव (सोलापूर) ः पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी होतो फिल्टरचा वापर. माणसाला पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बसविला जातो फिल्टर. मात्र, डाळिंब बागेच्या फवारण्यासाठी फिल्टरचे पाणी एखाद्या शेतकऱ्याने वापरले असेल तर त्यावर कोणाचा विश्‍वास बसेल काय? तर त्याचे उत्तर नाही असेच असेल. मात्र, हे शक्‍य करुन दाखविले आहे निमगाव (म.) (ता. माळशिरस) येथील अप्पासाहेब मगर-पाटील या शेतकऱ्याने. 

शेतकरी कधी काय प्रयोग करेल याचा नेम नाही. त्या प्रयोगाचा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र, शेतकऱ्याची प्रयोगशी वृत्ती त्याच्यामध्ये असलेल्या शास्त्रज्ञाची जाणीव करुन देते. एखादा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा मोठा फायदा त्या शेतकऱ्याला होता. डाळिंबामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याने जर बागेत प्रवेश केला तर पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होते. त्यावर काहीतरी उपाय काढण्याचा, अनेक प्रकारची औषधे फवारण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जातो. पण, कधी-कधी त्यात यश येत नाही. पण, प्रयोगाच्या माध्यमातून एखादा निष्कर्ष निघाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो हेच मगर-पाटील यांनी दाखवून दिले आहे. 

श्री. मगर-पाटील हे जरवर्षी त्यांच्या डाळिंब बागेतून लाखो रुपयांचे उत्त्पन्न घेतात. त्यांनी या वर्षी जीवामृत स्लरी फिल्टर टॅंक आणि फवारणीसाठी फिल्टरचे पाणी वापरले आहे. डाळिंबाची लागवड 15 बाय 8 वर केली आहे. त्यांची एकूण तीन हजार 200 झाडे आहेत. यावर्षी सुमारे 50 ते 60 टन उत्पन्न निघेल, असा त्यांनी अंदाज वर्तविला आहे. फिल्टरच्या पाण्याचा वापर फवारणीसाठी केल्यास डाळिंबाचे उत्पन्न तर वाढतेच याशिवाय डाळिंबावर येणाऱ्या डागाचे प्रमाणही खूपच कमी असते असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना फिल्टरचे पाणी वापरूनच डाळिंबाची फवारणी करण्याचे आवाहन मगर-पाटील यांनी केले आहे. त्यांच्या डाळिंब शेतीला नुकतीच अकलूज पोलिस स्टेशनचे निरीक्षक भगवान निंबाळकर, आशिष खराडे यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 
 
 संपादन ः संतोष सिरसट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranate spray is used to filter water!