esakal | राज्यातील शेतीची कामे सुरू होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture

महाराष्ट्रातील लॉकडाउन व्यवस्थेचा फेरआढावा उद्या (ता. १३) घेतला जाणार असून शेतीची कामे बहुतांश सर्व जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीकामे आता सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने संसर्गाची लागण न झालेल्या गावात त्याबद्दलची परवानगी देणारा निर्णय जारी करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक असणारी कामेही सुरू केली जाणार असून त्याबद्दलचा आदेश उद्याच्या बैठकीत घेतला जाईल.

राज्यातील शेतीची कामे सुरू होण्याची शक्यता

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - महाराष्ट्रातील लॉकडाउन व्यवस्थेचा फेरआढावा उद्या (ता. १३) घेतला जाणार असून शेतीची कामे बहुतांश सर्व जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषीकामे आता सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने संसर्गाची लागण न झालेल्या गावात त्याबद्दलची परवानगी देणारा निर्णय जारी करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी आवश्‍यक असणारी कामेही सुरू केली जाणार असून त्याबद्दलचा आदेश उद्याच्या बैठकीत घेतला जाईल. सोशल डिस्टन्सिंग पाळू शकतील अशा कामांच्या याद्या संबंधित खात्याच्या सचिवांनी तयार कराव्यात आणि त्या कामांना सवलत मिळू शकेल काय यावर विचार केला जाईल.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मॉन्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवडयात होण्याची शक्‍यता गृहित धरून पावसाळी कामे सुरू केली जाणार आहेत. ज्या भागात बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत, तेथे मजूरांची काळजी घेण्याचे हमीपत्र घेवून कामे सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. पाया खणून ठेवलेल्या बांधकामांना विशेषत्वाने परवानगी दिली जाणार आहे. शेतीची कामे सुरू झाली नाही अर्थव्यवस्थेला कोट्यवधीचा फटका बसेल आणि गावांची अर्थव्यवस्था दयनीय होईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे. त्यानुसार राज्य सरकारने या विषयावर विचार केला आहे, असे समजते.

समृद्धी ,मेट्रो बांधकामेही सुरू ?
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधाविषयक प्रकल्प सुरू आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजूर नजिकच्या वसाहतीत आहेत. काम सुरू करण्यापूर्वी मजुरांची आरोग्यतपासणी होऊ शकते. जलसंपदा खात्यातील बांधकामांवरही मजुरांच्या वसाहती आहेत. तेथे कंत्राटदारांनी पगार देणे शक्‍य नसल्याची भूमिका घेतल्याने हे मनुष्यबळ वापरायचे की नाही विचार सुरू आहे. सध्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोप्रकल्पात भुयारी बांधकामांचे प्रमाण  आहे. तेथे खोदलेल्या जागा या लगतच्या इमारतींच्या पायासाठी धोकादायक ठरत असल्याने ही कामे सुरू करण्याचे आदेश जारी होतील, असे समजते. 

कोरोनामुक्त जिल्ह्यात कामांना ग्रीन सिग्नल?
अडकलेले मजूर घरी जाण्याची घाई करत आहेत. एवढ्या मजुरांचे वहन शक्‍य नाही, पण त्यांना काम देणे शक्‍य आहे काय याचा तपास केला जाणार आहे. ज्या जिल्हयांमध्ये लागण नाही अशा जिल्हयात अंतर्गत प्रवास सुरू करण्यास परवानगी मिळू शकेल. ग्रीन झोनतंर्गत किमान ५ जिल्हे अशा सवलतीस पात्र ठरू शकतील. शेजारील जिल्हे प्रभावित असतानाही वर्धा कोरोनामुक्‍त आहे.अशा जिल्हयांना बाहेरून कोणताही संपर्क येवू न देता तेथेच अंतर्गत व्यवहार सुरू करू द्यायचे काय यावर विचार होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे  सादरीकरण उद्या बैठकीत दाखवले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

loading image