शक्ती प्रदर्शनात राष्ट्रवादी यशस्वी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

नागपूर - 'संविधान बचाव, देश बचाव' या घोषणेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने नागपुरात यशस्वी शक्तिप्रदर्शन केले. हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृती व ईव्हीएमचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

नागपूर - 'संविधान बचाव, देश बचाव' या घोषणेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीने नागपुरात यशस्वी शक्तिप्रदर्शन केले. हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये मनुस्मृती व ईव्हीएमचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे "संविधान बचाव, देश बचाव' मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा अचानकपणे रद्द झाला. त्यांच्या अनुपस्थितीमध्येही नागपुरात विदर्भातून हजारो महिला नागपुरात दाखल झाल्या होत्या. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष व माजी मंत्री फौजिया खान यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पावसाळा व शेतीचा हंगाम असताना नागपुरात हा भव्य मेळावा यशस्वी होईल काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी हा मेळावा यशस्वी करून दाखविला. उपस्थितीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून महिला कार्यकर्त्या नागपुरात दाखल झाल्या होत्या.

या वेळी अजित पवार यांनी केंद्र सरकार व मनुवादी मानसिकतेवर कडाडून हल्ला केला. संभाजी भिडे सारखा माणूस आंब्याने मुले होतात, असे म्हणतो. हा स्त्रीत्वाचा अपमान आहे. भिडे मागे उभी असलेली शक्ती कोणती आहे? असा सवाल पवार यांनी केला. या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे. मनू श्रेष्ठ म्हणणाऱ्यांना या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. या मनूवादी मानसिकतेच्या विरोधात लढण्याची याकाळात गरज आहे. यासाठी महिला शक्तीने एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: power presentation NCP Success politics