Shivrajyabhishek : शिवरायांच्या चित्रांचा अनमोल ठेवा!

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हटलं की आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते. आपल्याला गर्व आणि अभिमान वाटतो छत्रपती शिवाजीराजांचा.
chhatrapati shivaji maharaj picture
chhatrapati shivaji maharaj picturesakal

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हटलं की आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते. आपल्याला गर्व आणि अभिमान वाटतो छत्रपती शिवाजीराजांचा. शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक दिन... प्रत्येक मराठी माणसात एक उत्साह संचारतो. खरं तर, छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा मानबिंदू, भारताच्या इतिहासात गुलामगिरीचे जोखड यशस्वीपणे तोडून काढणारे यशस्वी शासक. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मीळ अशी चित्रं जगभरात आहेत. त्याचा हा थोडक्यात आढावा...

जवळपास ३५०/४०० वर्षे झाली तरीही शिवरायांची जादू काही कमी होत नाही. त्यांची ख्याती सातासमुद्रापार पसरली आहे. शिवरायांचे दिसणे, बोलणे, चालणे, वागणे कसे होते याचे तपशीलवार वर्णन आपल्याला परकीय लोकांकडूनच कळू शकले. कारण शिवरायांच्या कारकिर्दीत अनेक परदेशी लोक शिवरायांना भेटले, त्यांच्या कार्याने प्रभावित झाले, त्यातील अनेकांनी त्यांचे चित्रे त्यांच्या हयातीतच रेखाटली, तर काहींनी पुढील काळात ती साकारली.

त्याबरोबरच त्यांची अनेक शस्त्रे देखील परदेशातील संग्रहालयात आहेत. शिवकालीन आणि शिवकाळाजवळची मिळून जवळपास १४ ते १६ चित्रे आज देश-परदेशात उपलब्ध आहेत. वैयक्तिक मला त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत रेखाटलेली मूळ लघुचित्रे नेदरलॅंड येथील ॲम्स्टरडॅमच्या रिक्सम्युझियममध्ये (Rijks Museum) ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची व पाहण्याची संधी मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्यावर हजारो पुस्तके आली आहेत, सतत सिनेमे-नाटकं-टिव्ही मालिका येत आहेत. शिवराय हा अस्मितेसह राजकारणाचा विषय आहे हे वास्तव आहे. परंतु आपण त्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वाचे. पुढील पिढीसाठी आपण कोणता आदर्श घालून देणार आहोत ते पाहिलं पाहिजे. मी देश-विदेशात भटकंती करत असतो.

लाखो लोकं फिरतात परंतु आपल्या इतिहासाच्या खाणाखुणा जगभर आहेत त्याचा शोध घेतातच असं नाही. आपल्या राष्ट्रासाठी महत्त्वाचा असणाऱ्या अशा ठेव्यांकडे डोळस नजरेने पाहून ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. रिक्स म्युझियमला गेलो असता शिवरायांची ती दोन्ही चित्रं डिस्पेमध्ये नव्हती कारण त्यांच्याकडे १० लाखाहून अधिक कलाकृती आहेत, ज्यामधील एकावेळी फक्त ८००० कलाकृती डिस्पे केल्या जातात.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन्ही चित्रं बघण्यासाठी मला विशेष परवानगी काढावी लागली व ती मला प्रत्यक्षदर्शी पाहता आली. दोन्ही लघुचित्रे गोवळकोंडा येथे १६७५ ते १६८५ दरम्यान दोन अज्ञात चित्रकारांनी डेक पेंट आणि गोल्ड लीफसह कागदावर ब्रश तंत्र वापरून साकारली आहेत. अतिशय सुंदर आणि ज्यावरून एखाद्याची नजर हटूच शकत नाही अशी ही लघुचित्रे.

ही दोन्ही चित्र ‘विटसेन अल्बम’मधील आहेत. यातील चित्र क्र. १ साधारण १८१६ पासून व चित्र क्र. २ हे १९७२ पासून त्या रिक्स म्युझियममध्ये आहे. उदाहरण म्हणून आज एका चित्राची माहिती शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लिहीत आहे ज्याचा उल्लेख ‘Potrait of Shivaji’ असा आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत काढल्याची दाट शक्यता आहे. कारण की त्या चित्रावर खालील बाजूस एक स्पष्ट मजकूर डच भाषेमध्ये लिहिला आहे.

तो असा आहे की, ‘शिवाजी, दख्खनचा राजा, ज्याचा मुलगा संभाजी आहे, त्याने गोवळकोंड्याचा राजा सुलतान अबुलहसन याच्या साम्राज्यावर चढाई केली.’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर शेवटच्या काळात ते दक्षिणेत असल्याच्या नोंदी आहेत व चित्रात त्यांच्या डोळ्याखाली सुरकुत्या पडल्याचे चित्रकाराने दाखवले आहेत. नीट विचार केल्यास, त्यातील ‘गोवळकोंडा सुलतान अबुलहसनच्या साम्राज्यावर चढाई केली,’ यावर लक्ष केंद्रित केले तर ते चित्र शिवाजी महाराजांच्या हयातीत काढल्याचा अंदाज बांधू शकतो.

चित्राच्या वरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पर्शियन भाषेत ‘सुरत-ए-सिवाजी-अस्त’ (हे शिवाजीचे चित्र आहे) असं नमूद केलंय तर पोर्तुगीज भाषांमध्ये खालील बाजूस महाराजांचे नाव ‘Siuagi’ असे कोरले आहे. एकाच चित्रावर पर्शियन, डच आणि पोर्तुगीज अशा तीन भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लिहिलेले हे एकमेव चित्र अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे असे एकच चित्र ज्यावर त्यांचे पुत्र संभाजी महाराजांचा उल्लेख आढळतो.

हे चित्र २० x १४cm चे आहे. एक तुरा, लाल-हिरवा व भरपूर सोनेरी रंग असलेला पागोटा अतिशय साध्या पद्धतीने गुंडाळलेला आहे. कानात फक्त एक बाळी व इतर कुठलाही दागिना नाही. त्यात पांढरा रंगाचा अंगरखा असून त्यावर लाल व फिकट तांबड्या रंगांचे पट्टे ओढले आहेत. चेहरा पाहिलात तर लांब कल्ले, टोकदार दाढी, विरळ मिशा, वक्राकार भुवया, मोठे व भेदक डोळे, बाकदार नाक व डोळ्याखालील सुरकुत्या असं काहीसं दिसतं.

उजव्या हातात धोप तर डाव्या हातात पट्टा धारण केलाय. तलवारीची मूठ व पट्ट्याची खोबणी पूर्ण सोन्याची आहे. एका झरोक्यात म्हणजेच खिडकीत ते थांबले आहेत हे खालील बाजूच्या जाळीमुळे कळतं. चित्रात चहू बाजूंनी पानाफुलांची नक्षी दिसते. दुसरे ही चित्र जवळपास अशाच पद्धतीचे आहे. एकूणच दोन्हीही लघुचित्रांवर सोन्याचे प्रचंड काम आहे आणि शिवाजी महाराजांचा चेहरा निर्विकार रेखाटला आहे.

छत्रपती शिवरायांच्या अव्वल आणि अस्सल अशा या दोन मूळ लघुचित्रांचे व्यक्तिशः साक्षीदार असलेल्या मोजक्या लोकांपैकी मी एक असल्याचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. इतिहास अभ्यासकांना खजिना खुला झाला व त्याचे व्हिडिओज सर्वत्र व्हायरलसुद्धा झाले. रिक्स म्युझियममध्ये तब्बल दोन तास या चित्रांचं मला निरीक्षण करताना त्या काळात गेल्यासारखं वाटलं.

लंडन, पॅरिसमध्येही ठेवा

तसेच लंडन, पॅरिस इत्यादी युरोपीय देशात शिवाजी महाराजांचे पेटिंग्ज् आहेत. त्यावर तरुण इतिहास संशोधक केतन पुरी यांनी सगळ्या चित्रांचा आढावा घेणारे ‘मराठा पातशाह’ हे संशोधनपर सविस्तर पुस्तक लिहिले आहे.

त्याबरोबरच युरोपमधील ‘द लंडन गॅझेट’ या वृत्तपत्रात २० फेब्रुवारी १६७२ रोजी छत्रपती शिवरायांची बातमी पहिल्या पानावर छापून आली होती. त्या वर्तमानपत्राची म्हणजे लंडन गॅझेटची ३४५ वर्षे जुनी अतिशय दुर्मिळ आणि अस्सल आवृत्ती इतिहास संशोधक मालोजीराव जगदाळे यांनी ती मिळवून भारतात आणली. म्हणजे ज्या वेळेस शिवाजी महाराज ढाल-तलवारीची लढाई करत होते त्यावेळेस युरोपात त्यांच्यावर बातमी लिखित स्वरूपात छापून आली होती.

त्याबरोबरच शिवरायांची ३ अस्सल चित्रे ही जगदाळे व माझ्या वैयक्तिक संग्रहात आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे १८७६ पासून लंडन येथील ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’कडे शिवरायांची जगदंबा तलवार आहे. ती मात्र सामान्य माणसांना सहजासहजी पाहता येत नाही. त्याच शहरात शिवकालीन वाघनखे एका संग्रहालयात पाहता येतात.

थोडक्यात काय तर, जगभरात बऱ्याच शिवकालीन गोष्टी आहेत ज्याचा मागोवा घेता येऊ शकतो. त्यामुळे पुस्तकं लिहिताना, नाटकं-सिनेमे करताना प्रत्येकाने जबाबदारीने कलाकृती निर्माण केल्या पाहिजे. आज ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनी एका चित्राचा व त्याबरोबरच जगभर पसरलेली शिवरायांची ख्याती किती मोठी आहे याबद्दल थोडं लिहिण्याचा प्रयत्न केला.

तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशात विविध ठिकाणी आणि जगभरात बऱ्याच जागी शिवरायांच्या विचारांचा जागर होतो. शोध घेतला तर शिवकाळातील अनेक चित्रे, लेख, शस्त्रे व इत्यादी वस्तू परदेशात सापडतात. आपण जगभर फिरताना डोळस नजर ठेवून आपला इतिहास समजून घेतला पाहिजे व त्यावर आपण काही सकारात्मक कृती करू शकतो का याचा विचार केला पाहिजे. इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमानात जगून भविष्याचा वेध घेता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना तोच खरा मानाचा मुजरा असेल…!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com