ठपका, शिक्का आणि फूट...

दीपा कदम
Thursday, 19 September 2019

भाजपची ‘बी टीम’
वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा ठपका काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून सुरू केला होता. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीच मुख्य विरोधी पक्ष असेल, अशी जणू शाबासकीच दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे महत्त्व कमी करण्यासाठी ‘वंचित’ला पुढे चाल द्यायची, हे फडणवीस यांचे चातुर्य असण्याची शक्‍यता आहे. मात्र, ‘वंचित’ तिच्या स्थापनेनंतर खूप कमी काळात राज्याच्या निवडणुकांच्या मुख्य प्रवाहात आली. वंचित बहुजन आघाडीने आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले असल्यामुळे शिवसेना, भाजपला नसेल तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला धास्ती वाटणे साहजिकच आहे.

मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील?

लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे रोजी जाहीर होत होते, त्याचवेळी दुपारच्या सुमारास दादरला आंबेडकर भवनात ॲड. प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. प्रकाश आंबेडकर त्यांच्या केबिनमध्ये भजी-पाव खात बसले होते. औरंगाबादच्या जागेचा निकाल अजूनही यायचाच होता. सोलापूर आणि अकोल्याच्या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाल्याचे मात्र स्पष्ट झाले होते. तरीही, प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि नेहमीचेच टिपिकल हसू लपले जात नव्हते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला भाजप-शिवसेना युतीने गारद केले नाही, तर निवडणुकीपूर्वी जेमतेम काही महिने आकाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीने पार आडवे पाडले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीला अस्मान दाखविण्याची कामगिरी ‘वंचित’ने केल्याचा आनंद आंबेडकरांना झालेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५२ च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत आणि त्यानंतरच्या १९५४ च्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने पराभूत केल्याची परतफेड त्यांच्या नातवाने या प्रकाराने केल्याचा तो आनंद होता. भाजपचा विजय ‘वंचित’ने सुखकर केला, याकडे प्रकाश आंबेडकर त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने दुर्लक्ष करीत राहिले. भाजपच्या विजयापेक्षाही काँग्रेसच्या पराभवाचे मोल त्यांना अधिक होते, असे एकूण लक्षण होते.

धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला त्याचा फटका बसणार, हे उघड होते. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावे, यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही मोठा दबाव होता. डॉ. आंबेडकरांचा राजकीय वारसा चालवणे, दलित राजकीय पक्षाचे नेते असणे, यामुळे उजव्या राजकीय विचारसरणीच्या विरोधात उभे राहणे अपेक्षितच आहे. शिवाय, सध्याच्या राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष पक्षांनी जी भूमिका घेऊन उभे राहायला हवे होते, त्या परिस्थितीत तर ही जबाबदारी अधिकच वाढते. पण, या सर्वांचा विचार प्रकाश आंबेडकरांनी स्वत:ला हवा त्याच पद्धतीने अपेक्षित उत्तरासह केला. त्यांनी काँग्रेससह आणि भाजप-शिवसेना युतीला समान पातळीवरचा शत्रू मानल्याचा आव आणला. वंचित बहुजन आघाडीची सरशी म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाडाव ठरलेलाच होता. लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ‘वंचित’ने काँग्रेसचे केलेले नुकसान भरून न येण्याच्या पुढे गेले असल्याचे स्पष्ट झाले.

कायम शंकेच्या भोवऱ्यात
लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस आघाडीला बसल्याचे स्पष्ट झाले. ‘वंचित’वर शंकेचे आसूड यासाठीही ओढले जाताहेत. कारण, धर्मनिरपेक्ष मतांची एकजूट असावी, यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी तरी मागे हटू नये, असा आग्रह समविचारी आणि दलित चळवळीतूनही केला जात होता. मात्र, काँग्रेसशिवाय राजकारणाची मोट बांधण्याचा आग्रह प्रकाश आंबेडकरांनी पुढे नेला आणि आता विधानसभा निवडणुकीतही तोच कायम राहणार आहे. विधानसभेतही ‘वंचित’ची तलवार काँग्रेसवर लटकणारच आहे.

वंचितचा जोर ओसरला?
प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कायम एकजातीय पक्षाच्या पलिकडे जाऊन पक्ष उभारणीवर भर दिला. वंचित बहुजन आघाडीपूर्वी ‘भारिप’ची उभारणीदेखील दलितांसह इतर बहुजन अशीच राहिलेली आहे. ‘वंचित’ने लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या जातीसकट ती केली, यावरूनच बहुजन जातींना एकत्र घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. मात्र, मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांमध्ये संघटन, नेतृत्वाचे महत्त्व असते ते ‘आरपीआय’च्या कुठल्याच गटामध्ये आणि नेतृत्वामध्ये दिसत नाही. एका मोठ्या पटलावर राजकीय पक्षाची उभारणी करताना विविध विचारांच्या लोकांची साथ लाभावी लागते, त्यांच्या विचारांचा आदरही करावा लागतो. सांघिक नेतृत्व मान्य करावे लागते. समविचारी पक्षांनाच काय विरोधी पक्षांचादेखील तुमच्या नेत्यांवर विश्‍वास असावा लागतो. प्रकाश आंबेडकरांना ही फूटपट्टी लावली तर ते कुठे बसतील?

वंचित आघाडीची स्थापना झाल्यापासून त्यांच्याभोवती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गोतावळा असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. काँग्रेससोबत ‘वंचित’ची गेले दोन महिने चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेत पारदर्शीपणा नव्हता. आंबेडकर चर्चेत एक बोलतात आणि माध्यमांकडे जाऊन वेगळेच बोलत असल्याचा काँग्रेसचाही आरोप होता. मागच्या दोन महिन्यांत वंचित आघाडीतील महत्त्वाचा असलेला पक्ष मुस्लिम इत्तेहादूल मुसलमिन बाहेर पडला. ‘वंचित’च्या स्थापनेत साथ देणारे लक्ष्मण मानेंनीही प्रकाश आंबेडकर ‘आरएसएस’च्या कच्छपी लागल्याचा आरोप करून पक्षाचा राजीनामा दिला. मागच्या चार महिन्यांत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी वंचित अजून भक्‍कम होणे अपेक्षित होते. अजून छोटे गट-तट ‘वंचित’सोबत येण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. एमआयएम बाहेर पडल्याने ‘वंचित’ला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसमुळे आमचे उमेदवार पडले, असा युक्‍तिवाद आंबेडकरांकडून करण्यात येत होता. राजकारणासाठी असा युक्‍तिवाद ठीक आहे. पण, मनुवादी विचाराच्या पक्षांशी लढण्याचीदेखील ही संधी आहे. अशा परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीत इतर कोणाचा पराभव करण्यापेक्षा स्वत: जिंकण्यासाठी ‘वंचित’ला निवडणूक लढवावी लागेल; अन्यथा ‘वंचित’वर बसलेला भाजपची ‘बी टीम’ हा शिक्‍का कायम होईलच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar and asaduddin owaisi Politics