Vidhan Sabha 2019 : ‘वंचितां’चे राजकारण सर्वसमावेशक - आंबेडकर

दीपा कदम
Sunday, 6 October 2019

राज्यातले प्रलंबित प्रश्‍न सोडवायचे आहेत; किंबहुना ज्यांना ‘पी-नट्‌स’ संबोधलं जातं, त्यांच्या प्रश्‍नांपासून काम सुरू करायचंय. आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, एनएचआरएम कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. पोलिसांची १२ तासांची ड्यूटी आठ तासांवर आणावी, असा आग्रह माझ्या आज्यानं धरला होता. तो प्रत्यक्षात आणणार आहे.  अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांच्याकडं आपलं व्हिजन मांडलं. त्यांच्याशी झालेली बातचीत...

विधानसभा 2019 
राज्यातले प्रलंबित प्रश्‍न सोडवायचे आहेत; किंबहुना ज्यांना ‘पी-नट्‌स’ संबोधलं जातं, त्यांच्या प्रश्‍नांपासून काम सुरू करायचंय. आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, एनएचआरएम कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. पोलिसांची १२ तासांची ड्यूटी आठ तासांवर आणावी, असा आग्रह माझ्या आज्यानं धरला होता. तो प्रत्यक्षात आणणार आहे. ओलितमधून कोरडवाहू क्षेत्रात पाणी घेऊन जाण्याचं नियोजन आहे. औद्योगिक विकासाला आणि रोजगारनिर्मितीला चालना द्यायची आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधी दीपा कदम यांच्याकडं आपलं व्हिजन मांडलं. त्यांच्याशी झालेली बातचीत...

राज्यात मुख्य प्रवाहात असलेल्या काँग्रेसची जागा घ्यायला वंचित पुरेसा तयार झाला आहे का?

वंचितवर्ग आता पूर्णपणे जागरूक झाला आहे. ‘इंडिया टुडे’नं २० वर्षांपूर्वी पाहणी केली होती. त्यामध्ये ५१ टक्‍के लोकांनी कुटुंबशाहीचं राजकारण, अधिकारशाही नको, असं मत व्यक्‍त केलं होतं. २० वर्षांत देश खूप बदललाय. यापुढं कोणी कोणाचं मिंधं व्हायला तयार नाही. लोकांचा राजकारणाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. काँग्रेसनं स्वत:ला बदललेलं नाही; म्हणूनच ते कालबाह्य ठरू लागलेत. इंजिन बदला किंवा संपूर्ण स्वत:ला बदलला. मार्क्‍सच्या भाषेत जर राजकीय पक्ष काळानुसार बदलले नाहीत, तर ते नामशेष होतील.

बदलत्या राजकीय परिस्थितीत जन्म घेतलेला ‘वंचित’ बारा बलुतेदारांवर भर देताना दिसतोय.

या पार्श्‍वभूमीवर वंचित हा आता सयुक्‍तिक आणि आवश्‍यक पक्ष ठरू लागलेला आहे. ‘वंचित’कडं भविष्याकडं पाहण्याची क्षमता आहे. देशाचा सामाजिक स्तर पाहिला, तर या देशातला कारागीरवर्गच भविष्य बघू शकतो. देवळातला वर्ग भविष्य पाहू आणि बदलू शकत नाही. देवळातला वर्ग स्थिर आणि निष्क्रिय (स्टॅटिक) असणं, अशा राजकीय व्यवस्थेला फायदेशीर असतं. त्यामुळेच राज्यातल्या ‘आरएसएस’च्या सरकारला ही परिस्थिती अशीच राहावी, असं वाटतं. त्यामुळेच सामाजिक, आर्थिक, संशोधनाच्या पातळीवर एक प्रकारची कुंठित अवस्था आलेली आहे. ही नैसर्गिक नव्हे; मनुष्यनिर्मित अवस्था आहे. या कारागीरवर्गाला ज्याला आपण बारा बलुतेदार म्हणतो; त्याला काळाबरोबर चालावं लागतं, तरच तो टिकू शकतो. बदल करू शकणाऱ्या बारा बलुतेदारांचं राजकीय संघटन आवश्‍यक वाटतं.

देशात औद्योगिक क्रांती झालेली आहे. औद्योगिकीकरणानं बारा बलुतेदार परंपरागत व्यवसायातून बाहेर पडताहेत. मग राजकारणाकडं बलुतेदाराच्या नजरेतून पाहण्याची आवश्‍यकता आहे का?

१९५० मधील औद्योगिक क्रांतीनं देशात नरसंहार केला. १९३२ मध्ये जातनुसार जनगणना झाली. त्या वेळी ६ हजारांपेक्षा अधिक लहान जाती, उपजाती होत्या. यापैकी अर्ध्या तरी आज शिल्लक आहेत का? याची मला शंका आहे. केंद्र सरकार म्हणूनच जात जनगणना करायला घाबरतंय. लोकसंख्या वाढलेली आहे; मात्र छोट्या जाती, समूह या आर्थिक बदलाचे बळी ठरलेले आहेत. युद्ध जसं नरसंहार करतं, तसे इकॉनॉमीसुद्धा नरसंहार करते. त्यामुळे विकास नैसर्गिक आणि संतुलित असावा, याचा बारा बलुतेदार वेगळ्या पद्धतीनं विचार करू शकतात, मला ते आवश्‍यक वाटतं.

काँग्रेसनं ‘वंचित’वर भाजपची ‘बी टीम’ असा ठपका ठेवलाय?

एखाद्यावर ४२० चा गुन्हा नोंदवला, तर त्यांना पाच मिनिटांसाठी तरी अटक व्हावी आणि त्यांना न्यायालयानं जामीन द्यावा लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जणांवर ४२०चे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते पाहा. पण, त्यांना अटक झालेली नाही. त्यांच्यावर गुन्हे आहेत, माझ्यावर नाहीत. ४२० चे गुन्हे असतील, तर यांना अद्याप अटक का केलेली नाही. मग काँग्रेस-राष्ट्रवादी ‘बी टीम’ आहे की वंचित? चोराच्या उलट्या बोंबा असल्यामुळे अशा शिक्‍यांचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. ‘वंचित’च्या रूपानं उभा राहिलेला नवीन प्रवाह आहे, त्याला बदनाम करण्याचं षड्‌यंत्र आहे. लोकांनी त्याला भीक घातली नाही आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला ४० लाख मतं मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांमुळे आमचा मतदार अधिक घट्ट होतोय. 

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर ‘वंचित’च विरोधी पक्ष असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ‘वंचित’ला ही शाबासकी वाटते का?

आमची ताकद इतकी वाढलीय, की त्याची भीती मुख्यमंत्र्यांनाही वाटू लागलीय. मनाची तयारी (माइंड कंडिशनिंग) करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. ‘वंचित’ची धाव विरोधी पक्षनेतेपदापर्यंत असेल, असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पण, आमचा दावा सरकार बनवण्याचा आहे.

‘वंचित’ला लोकसभेपेक्षा अधिक मतदान होईल, असा तुमचा दावा कशाच्या बळावर आहे?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेली ८० टक्‍के मतं ही मुस्लिमांची होती. मात्र, या निवडणुकीत मुस्लिम मौलवींनी आम्हाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. लोकसभेवेळी एमआयएम जरी आमच्या सोबत असली, तरी मौलवी त्यांच्याकडं नव्हते. या वेळी मात्र मौलवी आमच्यात आल्यानं ताकद वाढली आहे. ३० ते ३५ टक्‍के ओबीसींच्या छोट्या जाती, पोटजाती मतदार हा राज्यभर आहे. तो काँग्रेस, राष्ट्रवादीचा नाहीच. सध्यातरी हा २० टक्‍के मतदार आमच्याकडं आहे, याची भाजपला चिंता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Interview