आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले.... 

प्रमोद बोडके
Thursday, 25 June 2020

सोलापूरला वाढले नेत्यांचे दौरे 
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी आता सोलापूरला राजकीय नेत्यांचे व लोकप्रतिनिधींचे दौरे वाढू लागले आहे. आठवड्याला पालकमंत्री भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या शिवाय जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचा दौरा केला आहे. आज प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या दौऱ्यावर होते. उद्या (शुक्रवार) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. 

सोलापूर : महाराष्ट्र एकीकडे कोरोनाचा सामना करत असताना आता कालपासून नवीनच एक मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजकीय नशीब अजमावण्यासाठी ज्या वंचित बहुजन विकास आघाडीचा काही महिन्यांसाठी आसरा घेतला होता. त्या वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना या विधानाबद्दल काय वाटते? याची माहिती जाणून घेण्याचा आज आम्ही प्रयत्न केला. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. येथील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार कधी? असाच प्रश्‍न सर्वांना पडला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी थेट सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

सोलापूरचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणेही आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. पालकमंत्री भरणे यांची बैठक व पत्रकार परिषद सुरु असल्याने आंबेडकर यांना काही काळ वाट पहावी लागली. पालकमंत्री भरणे पत्रकार परिषद संपवून आंबेडकर यांच्या भेटीसाठी गेले. कोरोना संदर्भातील बैठक संपवून जात असताना प्रकाश आंबेडकर यांना आमदार पडळकर यांच्याबद्दल तब्बल दोन वेळा प्रश्‍न विचारला, दोन्ही वेळा त्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली. शेवटी नो कॉमेंट्‌स म्हणत पत्रकारांना टाळत आंबेडकर निघून गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या या प्रकरणात आंबेडकरांना काय वाटते? हे कोडे आजही कायमच राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar said on the statement of MLC Padalkar ....