esakal | उद्योग सुरु करायचाय?; ‘या’ योजनेतून मिळेल प्रशिक्षण. सविस्तर वाचाच...
sakal

बोलून बातमी शोधा

youth_cab

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून सरकारने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान सुरु केले. यामध्ये राज्यात दोन हजार २७५ प्रशिक्षण संस्था आहेत. युवक युवतींना प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

उद्योग सुरु करायचाय?; ‘या’ योजनेतून मिळेल प्रशिक्षण. सविस्तर वाचाच...

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान सुरु आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानातील कौशल्य प्रशिक्षणाचा आतापर्यंत राज्यातील एक लाख ७३ हजार ९१५ युवक- युवतींनी लाभ घेतला आहे.

राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार प्राप्त व्हावा म्हणून सरकारने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान सुरु केले. यामध्ये राज्यात दोन हजार २७५ प्रशिक्षण संस्था आहेत. युवक युवतींना प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. राज्यातील युवक व युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान म्हणजे आर्थिक सक्षमता प्रदान करणारे मूलभूत केंद्र ठरले आहे. ही योजना सर्व प्रवर्गासाठी लागू असल्यामुळे सर्वच प्रवर्गातील युवक व युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येतो. 

या योजनेचा उद्देश...

राज्यातील इच्छूक युवक- युवतींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण देणे व त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेसाठी राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिक संधी असलेली ११ क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. बांधकाम, उत्पादन व निर्मिती, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, आतिथ्य, आरोग्य देखभाल, बँकिंग, वित्त व विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन व रसायने, माहिती तंत्रज्ञान व संलग्न, कृषी प्रक्रिया ही प्राधान्याची क्षेत्रे आहेत. इतर अन्य महत्त्वाची क्षेत्रांतही (जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी आदी) अशा विविध प्रशिक्षणाचा योजनेत समावेश आहे.

अधिक माहितीसाठी...

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in/#/collapse1 या वेबपोर्टलवर प्रशिक्षण संबंधीत माहिती देण्यात आली आहे. येथेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

योजनेच्या अटी...

या योजनेसाठी १५ ते ४५ या वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य मिळविण्यासाठी प्रशिक्षण मिळते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीकडे संबंधित  प्रशिक्षण मिळविता येते.