
राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडूनच रसद पुरवल्याचा संशय
BJP-MNS युतीबाबत भाजप नेत्यांच मोठं विधान म्हणाले, बेरजेचं..
सांगली - भाजपने मनसेला सोबत घेणे, हे बेरजेचे राजकारण ठरेल. भाजपचे प्रदेश नेते त्यावर अधिक बोलतील, मात्र राज ठाकरे यांना सोबत घेतल्याचा अन्यत्र फटका बसणार नाही, अशी व्यवस्था करून हा निर्णय घेणे शक्य आहे, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडूनच रसद पुरवली गेल्याचा संशय आहे. खासदार बृजभूषण सिंह यांचे पवारांशी असलेले संबंध, खासदार सुप्रिया सुळे यांची वक्तव्ये, आमदार रोहित पवार यांचा आयोध्या दौरा हे सगळे पाहता तसेच दिसते आहे. बृजभूषण सिंह यांची ती भूमिका म्हणजे भाजपची भूमिका नव्हे, कारण राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचे आम्ही स्वागतच केले आहे. आमची भूमिका हिंदुत्वाची आहे आणि त्यासाठी राजकारणापलिकडे जाण्याची आमची नेहमीच तयारी राहिली आहे. या मुद्यावर राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती केल्यास ते बेरजेचे राजकारण ठरेल. त्याचा अन्यत्र फटका बसणार नाही, याची दक्षता घेता येईल.
हेही वाचा: तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगची बोट पलटी, २ तरुणांचा मृत्यू
पुढे ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षात राज्यातील सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. वीस-पंचवीस वर्षे राज्य मागे गेले आहे. फडणवीसांना विकासाला गती दिला होती. ती थांबली आहे. महापुराचे नियोजन शून्य आहे. फक्त बदल्या, वसुली आणि सरकार टिकवणे यात स्वारस्य दिसते आहे. महागाईचे ढोल पिटून झाले, त्यात केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, मात्र केंद्राचे नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत आणि ते सामान्यांबद्दल संवेदनशील आहेत. त्यांनी तातडीने पेट्रोल, डिझेल दरात कपात केली आणि उज्ज्वला गॅस सिलिंडर स्वस्त केला. महाविकास आघाडीने काय केले? राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था आहे. किमान राज्याच्या तुलनेत निम्मा तरी दर कमी करायला हवा होता. टीका, टोमणे यापलिकडे काहीच करत नाहीत. मोदी, भाजपच्या नावाने बोटे मोडण्यापलिकडे कामच नाही. किमान कर प्रणालीविषयीची माहिती तरी घ्यायची.
शेती, खते, बियाण्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. महाबीजने बियाण्यांचे दर २२५० रुपयांवरून ४२५० रुपये केले आहेत. ५० लाख शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. राज्य शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करतो. हर घर जल योजनेवर केंद्र सरकारने ३ लाख ६० हजार कोटी खर्चाचे उद्दीष्ट ठेवलेले आहे. देशभरात १८ कोटी घरांत नळ कनेक्शन जाणार आहे, अन्य राज्यांत किमान २५ टक्क्यांवर काम झाले आहे. महाराष्ट्रात १४ टक्क्यांवर काम नाही. त्यात राज्याचा वाटा दिला जात नाही. काम झाले तर त्याचे श्रेय मोदींना जाईल, अशी यांना भिती वाटते.
हेही वाचा: संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
संभाजीराजेंचा ‘गेम’ करायचा आहेत का?
छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्य सभा उमेदवारीवरून प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, संभाजीराजेंचा गेम करायचा आहे, असा मला संशय येतोय. कारण, संभाजीराजेंना आधी पवारसाहेबांनी पाठींबा जाहीर केला. ते महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. त्याअर्थी त्यांनी शिवसेना, काँग्रेसला विश्वासात घेतले असेल, असे गृहित धरले पाहिजे. दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत वेगळेच बोलले, तिकडे काँग्रेस गप्प बसली. या सगळ्याचा अर्थ काय? छत्रपतींचा योग्य सन्मान झाला पाहिजे. सध्याची कृती अवमान करणारी आहे.
Web Title: Pravin Darekar Says On Mns And Bjp Together Beneficial For Bjp In Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..